राज्यातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

By admin | Published: May 14, 2017 03:17 AM2017-05-14T03:17:26+5:302017-05-14T03:17:26+5:30

स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.

Honor to the President of the Three Servants of the State | राज्यातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

राज्यातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रुग्णसेवेचे पवित्र कार्य मनोभावे करताना इतरांना आदर्श ठरेल अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.
राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातील एकूण ३५ परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिन ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते. सन्मानपदक, प्रशस्तिपत्र आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार १९७३ पासून प्रदान करण्यात येतात.
राष्ट्रपती म्हणाले की, परिचारिकांच्या योगदानावरच आरोग्य क्षेत्राचे यश अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील व्यवस्थेमध्ये परिचारिका, आरोग्यसेविका, आरोग्य सहायिका यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्या कमी खर्चात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करतात. राष्ट्राला या सेवेचा गर्व आहे.
२० व्या तसेच २१ व्या शतकात आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळेच शहरी तसेच ग्रामीण जीवनमान उंचावले आहे. यासह माता मृत्युदर, नवजात शिशू मृत्युदर नियंत्रित करण्यामध्ये मोठे यश आले असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
>कर्कग्रस्त बालकांची सेवा
स्वप्ना जोशी, मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या नर्सिंग अधीक्षक. गेल्या तीन दशकांपासून परिचारिका म्हणून व कॅन्सरग्रस्त बालकांसाठी विशेष कार्य. बालकांना होणारे कॅन्सर (आॅन्कोलॉजी) यामध्ये पदव्युत्तर शिक्षण. या विषयांवर अधिक संशोधनासाठी ‘माय चाइल्ड मॅटर्स’ या प्रकल्पावर काम. कॅन्सरग्रस्त बालकांना कशा पद्धतीने हाताळायला हवे याबाबत अन्य परिचारिकांना प्रशिक्षण. ‘वैद्यकीय शस्त्रक्रिया नर्सिंग’ या पुस्तकाचे लेखन व ‘प्रसूती शास्त्रातील नर्सिंग’ या पुस्तकाचे सहलेखन. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक शोधप्रबंध सादर. नोंदणीकृत परिचारिका तसेच नोंदणीकृत मिडवाइफ आहेत.
>समर्पित व उत्साही सेवा
चंद्रकला चव्हाण, आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, अडावत, ता. चोपडा, जि. जळगाव. गेली ३२ वर्षे समर्पित व उत्साही भावनेने काम. ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’, प्रसूतिपूर्व आरोग्यविषयक जागरूकता आणि राष्ट्रीय कुटुंंबकल्याण कार्यक्रम राबविण्यात नेहमी पुढाकार. त्याबद्दल स्थानिक पातळीवर गौरव. कुशल बाळंतपण, नवजात शिशू सुुरक्षा कार्यक्र मातही हिरिरीने सहभाग. मोठ्या प्रमाणात जागरूकता केल्यामुळे सन २०१३-१४मध्ये त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक प्रसूतींची नोंद. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातही स्वयंस्फूर्तीने सहभाग.
माता-शिशूची काळजी
कल्पना गायकवाड, आरोग्य सहायिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, ढेकू, ता. अमळनेर, जि. जळगाव.२८ वर्षांची समर्पित सेवा. प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीदरम्यान मातेची तसेच नवजात शिशूची काळजी यासह कुटुंबकल्याण यासंबंधात विशेष कार्य. केंद्र शासनाच्या सर्वच आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने पुढाकार. यापूर्वी कामाची स्थानिक पातळीवरही वाखाणणी.

Web Title: Honor to the President of the Three Servants of the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.