उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 10:58 AM2019-05-28T10:58:15+5:302019-05-28T11:33:57+5:30
उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
बाराबंकी - उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने उत्तर प्रदेशच्या बाराबांकी जिल्ह्यामधील एका गावातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गावातील एका दुकानातून काही गावकऱ्यांनी दारू विकत घेतली होती. मात्र दारू प्यायल्यानंतर त्यांची दृष्टी गेली. तसेच इतरही त्रास सुरू झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण आजारी पडल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Barabanki: Eight people have died after consuming spurious liquor in Ramnagar yesterday. Lekhpal, Sadar Badel, says, "I have got information that eight people have died in Ramnagar. Today, 3 people were admitted at the hospital out of which one person has passed away." pic.twitter.com/NHD80dfzNi
— ANI UP (@ANINewsUP) May 28, 2019
आसाममध्ये विषारी दारूमुळे 127 जणांचा मृत्यू
आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विषारी दारू प्यायल्याने अनेकांची अचानक तब्येत बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 127 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसेच दारूचे नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. विषारी दारू ही शहराच्या बाहेरून आणली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचार्यांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले होते.
विषारी दारूमुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये 92 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने याआधी तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. सहारनपूरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील 36 जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. विषारी दारूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहारनपूरच्या 18 लोकांचा उपचारादरम्यान मेरठमध्ये मृत्यू झाला होता. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू असे प्रशासनाने सांगितले आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी छापे मारुन आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून बेकायदा दारू मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली होती.