BH सीरिज नंबर प्लेटनंतर आता हॉर्नचा 'नंबर'; नितीन गडकरींची मोठी घोषणा, लवकरच बदल दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 10:46 AM2021-08-31T10:46:48+5:302021-08-31T11:36:17+5:30
कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न बंद करण्याची तयारी; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती
नवी दिल्ली: नवीन वाहनांसाठी भारत सीरिजची अधिसूचना जारी केल्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी हॉर्नकडे लक्ष वळवलं आहे. गाड्यांच्या क्रमांकांमध्ये होणारा घोळ टाळण्यासाठी गडकरींनी गेल्याच आठवड्यात बीएच (भारत) सीरिजची घोषणा केली. नंबर प्लेटबद्दल घेतलेल्या निर्णयानंतर आता पुढचा नंबर कर्णकर्कश हॉर्नचा असेल. लवकरच यासंदर्भात मोठे बदल करणार असल्याची माहिती गडकरींनी दिली. यासाठीचे नियम लवकरच तयार केले जातील आणि ते थेट वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी असतील, असं गडकरींनी सांगितलं आहे.
कर्णकर्कश हॉर्नमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना गडकरींनी स्वानुभव सांगितला. 'मी नागपुरात ११ व्या मजल्यावर राहतो. रोज सकाळी मी १ तास प्राणायाम करतो. मात्र हॉर्नमुळे सकाळची शांतता भंग होते. हा त्रास झाल्यानंतर गाड्यांचे हॉर्न योग्य पद्धतीचे असायला हवेत असा विचार मनात आला. गाड्यांच्या हॉर्नचे आवाज भारतीय वाद्यांचे असावेत असा विचार आम्ही सुरू केला असून त्यावर काम सुरू आहे. हॉर्नमधून तबला, पेटी, व्हॉयलिन, बिगुल, बासरी यासारख्या वाद्यांचे आवाज ऐकू यायला हवेत,' असं गडकरींनी सांगितलं.
डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा, पर्यायांवर भर द्या; नितीन गडकरींनी दिल्या कंपन्यांना सूचना
हॉर्न ऐकण्यासाठी योग्य असायला हवेत. यासाठी लवकरच नवा नियम तयार करण्यात येईल. यासंदर्भात कायदा लागू केला जाईल. यापैकी काही नियम वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना लागू होतील. त्यामुळे गाडी वाहनाची निर्मिती होत असतानाच त्यात योग्य प्रकारचे हॉर्न लागलेले असतील, अशी माहिती गडकरींनी दिली.
गेल्या काही दिवसांत नितीन गडकरींच्या विभागानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जुनी वाहनं भंगारात काढण्यासाठी नवं धोरण जाहीर करण्यात आलं. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बीएच सीरिजचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत नोंदणी करणाऱ्यांना बीएचची नंबर प्लेट मिळेल.