प्रयागराजमध्ये कोरोना काळासारखंच भयावह चित्र, गंगेच्या काठावर पुन्हा दिसला मृतदेहांचा ढीग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 09:10 AM2022-05-18T09:10:38+5:302022-05-18T09:16:49+5:30
खरे तर, आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि गंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर, नदीच्या काठावर दफन करणअयात आलेले मृतदेह गंगेच्या पाण्यात जाण्याचा धोका आहे. यामुळे नदीही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होईल. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचेही पूर्णपणे दूर्लक्ष होत आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मृतदेहांचे दफन केले जात आहे. येथील फाफामऊ घाटाने तर पुन्हा एकदा कोरोना काळातील आठवणी ताज्या केल्या आहेत. पूर्वीपासूनच येथे मृतदेह दफन करण्याची परंपराच आहे. पण, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) आणि जिल्हा प्रशासनाने गंगा घाटांवर मृतदेहांचे दफन करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही येथे मृतदेहांचे दफन होणे हा एक चिंतेचा विषय आहे. फाफामऊ घाटावर रोजच्या रोज डझनावर मृतदेह वाळूत दफन केले जातात. यामुळे येथे केवल थडगेच-थडगे दिसत आहेत.
खरे तर, आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि गंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर, नदीच्या काठावर दफन करणअयात आलेले मृतदेह गंगेच्या पाण्यात जाण्याचा धोका आहे. यामुळे नदीही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होईल. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचेही पूर्णपणे दूर्लक्ष होत आहे.
कोरोना काळातही दिसले होते भयावह चित्र -
गेल्या वर्षी कोरोना काळात गंगा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मृतदेह दफन करण्यात आले होते. माध्यमांनी हा विषय उचलल्यानंतर, याची जगभरात चर्चा झाली होती. यानंतर प्रयागराज महापालिकेने वाळूत दफन केलेले शेकडो मृतदेह बाहेर काढून त्यांना अग्नी दिला. यानंतर प्रशासनाने नदीच्या काठावर मृतदेह दफन करण्यावर बंदी घातली होती. मात्र, बंदी असतानाही लोकांनी पुन्हा गंगा नदीच्या काठावर मृतदेह दफन करायला सुरुवात केली आहे.
NGT ने मागितील कोरोना काळात गंगेत आढळलेल्या मृतदेहांची माहिती -
यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही गंगा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर मृतदेह वाहून आल्याचे दिसले होते. यावरून विरोधकांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकाही आली आहे. यानंतर आता कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले अथवा नदीच्या काठावर दफन करण्यात आले, यासंदर्भात NGT ने सरकारकडून माहिती मागवली आहे.