हॉरिबल! विचारही करवणार नाही; मालगाडीच्या खाली बसून चार मुले प्रवास करत होती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 03:08 PM2023-08-03T15:08:56+5:302023-08-03T15:09:12+5:30
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात तुम्ही विचारही करू शकणार नाही अशी घटना समोर आली आहे.
आजवर तुम्ही विमानाच्या चाकांच्या गॅपमध्ये बसून हजारो मैलांचा प्रवास केला, अशा बातम्या ऐकल्या असतील. परंतू, मालगाडीच्या दोन बाजुच्या चाकांमधील रॉडवर बसून कोणी प्रवास केला असे ऐकले नसेल. झारखंडमध्ये अशी घटना घडली आहे.
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात तुम्ही विचारही करू शकणार नाही अशी घटना समोर आली आहे. चार मुले चालत्या मालगाडीच्या चाकाच्या रॉडवर बसून प्रवास करत होती. ही घटना चक्रधरपूर रेल्वे विभागातील किरीबुरू पोलीस स्टेशन परिसरातील खाणबहुल क्षेत्रातील आहे. सेलमधील मेघाहातुबुरू लोडिंग पॉईंटवर एका मजुराने चार मुलांना मालगाडीच्या चाकांमधून प्रवास करताना पाहिले आणि रेल्वेला याची माहिती दिली.
या मजुराने या मुलांचा व्हिडीओ बनविला आणि रेल्वेला माहिती दिली. यानंतर रेल्वेने मालगाडी थांबवत मुलांना सुखरुप बाहेर काढले. रेल्वे अधिकाऱ्यांनीही मुलांना हे कृत्य केल्याबद्दल खडसावले आणि पुन्हा असे न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मजुराने काढलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे. मालगाडीच्या खाली बसून प्रवास करण्याचा हा व्हिडीओ लोकांना त्रस्त करत आहे. थोडीजरी चूक झाली असती तरी ही मुले मालगाडीखाली सापडली असतील. ही चारही मुले सारंडातील आदिवासी समाजाची आहेत.