फटाक्याचा भीषण स्फोट, स्कूटरवरुन फटाके घेऊन जाणाऱ्या पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 07:28 PM2021-11-05T19:28:52+5:302021-11-05T19:29:04+5:30
घटना पुडुचेरीच्या वेल्लुपुरम सीमेवर घडली, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे.
पुद्दुचेरी: दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे अपघात झाल्याच्या घटना घडतात. या वर्षीही अनेक ठिकाणी फटाक्यांमुळे अपघा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच एका अपघातात पिता-पुत्राला आपला जीव गमवावा लागला आहे. पुद्दुचेरीच्या वेल्लुपुरम सीमेवर स्कूटरवर फटाके घेऊन जाताना फटाक्यांच्या अचानक स्फोट होऊन पिता-पुत्राचा मृत्यू झाला.
ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्याने जात असलेल्या एका स्कूटरचा अचानक स्फोट होऊन धूर पसरल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्या तारखेनुसार 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा वेदनादायक अपघात घडला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, स्कूटरवरुन पिता-पुत्र जात होते, तेवढ्यात स्कूटरमध्ये ठेवलेल्या फटाक्यांचा अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात स्कूटरचे तुकडे झाले, तर वडील आणि सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत अन्य तीन जण जखमी झाले, तर अन्य तीन वाहनांचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, धडकेमुळेच फटाके फुटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असे सांगण्यात येत आहे की वडील आणि मुलगा त्यांच्या घराच्या अगदी जवळ पोहोचले होते, परंतु घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले.