भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:20 IST2025-04-16T18:20:30+5:302025-04-16T18:20:47+5:30
या घटनेचा विचार केला तरी अंगावर शहारे येतील, शेकडो लोकांसमोर ही घटना घडली आहे.

भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
राजस्थानच्या सवाई माधोपुरमधील प्रसिद्ध असलेल्या त्रिनेत्र गणेश मंदिरात एक भयानक घटना घडली आहे. जंगलातून आलेल्या वाघाने मंदिरात प्रवेश केला आणि तिथे उपस्थित भाविकांसमोर खेळत असलेल्या सहा वर्षांच्या मुलाला उचलून घेऊन गेला.
या घटनेचा विचार केला तरी अंगावर शहारे येतील, शेकडो लोकांसमोर ही घटना घडली आहे. वाघाच्या या हल्ल्यात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एक महिला आणि तिचा लहान मुलगा मंदिरात देवाचे दर्शन घेऊन बाहेर पडत होते. अचानक जंगलातून एक वाघ आला आणि त्याने त्या मुलाला उचलून नेले, असे प्रत्यक्षदर्शी रामसिंह गुर्जर यांनी सांगितले.
अचानक आलेल्या वाघाने त्या मुलाच्या मानेला जबड्यात पकडले होते. तशाच अवस्थेत तो जंगलात पळून गेला. लोकांनी आरडाओरडा करून मुलाला वाघाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतू, वाघ त्याला बधला नाही. वन विभागाने वाघाचा शोध घेतला आहे. त्यांनी वाघाला जंगलात पाहिले असून त्यांच्या नुसार वाघ एका जागेवर बसला आहे, मुलाच्या मानेवर त्याने पंजा ठेवलेला आहे. मुलगा निपचित पडलेला असून त्याचा हालचाली होत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. वन क्षेत्राला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मुलाचा मृतदेह वाघाच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मंदिराकडे जाण्यास मनाई करण्यात आली असून लोकांनाही जंगलाच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वाघाने लोकांसमोर अशा प्रकारे लहान मुलाला नेल्याने त्याच्या आईसह प्रत्यक्षदर्शींना देखील धक्का बसला आहे.