हद्द झाली! त्रास डाव्या पायाला, पण डॉक्टरांनी उजव्या पायावर केली शस्त्रक्रिया; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 05:07 PM2022-03-05T17:07:57+5:302022-03-05T17:08:09+5:30
डॉक्टरांचा हलगर्जीपणा; चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया केल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ
लखनऊ: आग्र्यातील एका रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. एत्मादौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रुग्णालयातील एका डॉक्टरांनी चुकीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. डाव्या पायाच्या हाडामध्ये समस्या असताना डॉक्टरांनी उजव्या पायावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पण या प्रकरणी त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही.
आवलखेड्यात वास्तव्यास असलेले योगेंद्र सिंह शेतकरी आहेत. २३ जानेवारीला दुचाकीवरून जात असताना त्यांना ट्रकनं धडक दिली. त्यात ते जखमी झाले. त्यांना एत्मादौलातील डॉ. शशिपाल सडाना यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. घरी गेल्यावरही वेदना कमी झाल्या नाहीत. डावा पाय दुखत होता.
पायाच्या वेदना कमी होत नसल्यानं कमला नगरमधील एका रुग्णालयात एक्सरे आणि सीटी स्कॅन करण्यात आला. उजवा पाय व्यवस्थित असून त्रास डाव्या पायाला असल्याचं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर योगेंद्र सिंह डॉ. सडाना यांचं रुग्णालय गाठलं. त्यांनी तक्रार केली. त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. डॉक्टरांनी उपचार करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर या प्रकरणी रुग्णाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
दोन पाय पार्श्वभागाजवळ येतात, त्या भागाला दुखारत झाली असल्याचं डॉ. सडाना यांनी सांगितलं. शस्त्रक्रिया व्यवस्थित करण्यात आली. रुग्णाच्या कुटुंबीयांचे आरोप खोटे आहेत. रुग्णाला सर्व रिपोर्ट दाखवण्यात आले आहेत. त्यातून त्यांचं समाधान झालं आहे. आता त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या नाही, असं सडाना म्हणाले.