भयानक! पतीसमोरच हॉस्पिटल कर्मचाऱ्यानं पत्नीचा विनयभंग केला तरीही...; मन सुन्न करणारी कहानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 06:26 PM2021-05-10T18:26:04+5:302021-05-10T18:29:06+5:30
उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या स्टाफने तिचा विनयभंग केला. पैशांसाठी तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. या सर्व कटू गोष्टी आठवून रुचिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं
पटणा – कोरोना महामारीनं लोकांना केवळ शारिरीक, मानसिक आणि आर्थिक फटका बसला आहे त्यासोबतच अशा संकटात माणुसकीला लाजवणारी घटनाही पाहायला मिळत आहे. अशीच एक कहानी आहे रुची आणि रोशनची. रुची २६ दिवस तिचा पती रोशनसाठी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनाशी लढत होती तरीही पतीला वाचवू शकली नाही.
उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या स्टाफने तिचा विनयभंग केला. पैशांसाठी तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. या सर्व कटू गोष्टी आठवून रुचिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. रुचीने जे सहन केलंय ते भयानक आहे. तिने तिच्या पतीच्या डोळ्यात ऑक्सिजन संपण्याची भीती पाहिली होती. पटनाच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनचा काळा बाजार सुरू होता. रुचीने पती रोशनच्या जीवासाठी ते खरेदीही केले परंतु पतीला वाचवू शकली नाही.
रुचीने डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणाबद्दल एका हिंदी चॅनेलला मुलाखत दिली. त्यात म्हटलंय की, कोरोना झाला तर त्यातून वाचू शकतो परंतु हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे जीव जाणे निश्चित आहे. २६ दिवसांपर्यंत नवऱ्यासोबत सावलीने असलेल्या रुचीला शेवट नवऱ्याला वाचवता आलं नाही. रुची तिच्या नवऱ्यासोबत कुटुंबाला भेटण्यासाठी भागलपूरला आली होती.
९ एप्रिलला पती रोशनला सर्दी ताप आला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. रुचीच्या नवऱ्याच्या देखभालीसाठी हॉस्पिटलमध्ये कायम होती. त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी ज्योती कुमारने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला ते तिच्या पतीने पाहिलं. परंतु बेडवर खिळलेला पती काहीच करू शकला नाही. डॉक्टरांकडून व्यवस्थित उपचार न झाल्याने रुचीला मायांगज हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं. त्याठिकाणी बिकट अवस्था होती. ICU मध्ये एकामागोमाग एक रुग्ण मरत होते. कोणी काहीही ऐकत नव्हतं. रुचीने सांगितले की, एक व्यक्ती डॉक्टर डॉक्टर ओरडून खाली पडला आणि त्याचे डोके फुटले. सगळीकडे रक्त उडालं. तरीही डॉक्टरांना फरक पडला नाही. डॉक्टर आणि नर्स त्यांच्या रुममध्ये मोबाईलवर पिक्चर बघत होते परंतु रुग्णाला बघण्यासाठी कोणीच आलं नाही असा आरोप करण्यात आला.
रुचीची मोठी बहिण ऋचा सिंहने आरोप केला की, हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि स्टाफ वाईट नजरेने पाहायचे. अनेकदा त्यांनी अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मायागंज हॉस्पिटलमधून एअर एम्ब्युलन्सने दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला परंतु एम्ब्युलन्स मिळाली नाही त्यामुळे पटना येथील खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलं. याठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं सांगत स्वत: हॉस्पिटल ऑक्सिजन सिंलेडर ५० हजार रुपयांना विकत होतं.
रोशन आणि रूची नोएडा येथे राहत होते. रोशन सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता. परंतु पैसा असूनही रोशनला मृत्यूपूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रोशनचा मृत्यू हॉस्पिटलमधील गैरव्यवस्थापन आणि ऑक्सिजन संपण्याची भीती यामुळे झाली आहे. रुची आणि रोशन ५ वर्षापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकले होते. रोशनच्या आठवणीत रुचीला अश्रू अनावर होत होते. २६ दिवसांच्या या कालावधीत हॉस्पिटलला राहिली परंतु पतीला वाचवू शकली नाही.