सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच रुग्णालयांना आगी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 06:38 AM2021-01-13T06:38:24+5:302021-01-13T06:38:54+5:30
गुजरातमध्ये चार महिन्यांत हॉस्पिटल्समध्ये आगीच्या ६ गंंभीर दुर्घटना
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भंडाऱा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा जीव घेतलेल्या आगीने रुग्णालयाच्या प्रशासकांच्या निष्काळजीपणाला उघडे पाडले आहे. रुग्णालयांत लागणाऱ्या आगी या सर्वोच्च न्यायालय आणि गृहमंत्रालयाने दिलेले आदेश आणि मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लागत असून त्याची किमत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मोजावी लागत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर, २०२० रोजी दिलेल्या आपल्या आदेशात रुग्णालयांत लागणाऱ्या आगींसाठी स्पष्टपणे रुग्णालय प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे. न्यायालयाने सगळ्या राज्यांना प्रत्येक रुग्णालयात फायर सिक्युरिटी ऑडिट करून रुग्णालयांना अग्नीशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आदेश दिले. असे न केल्यास रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाईचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. या आधी गृह मंत्रालयाने ३० नोव्हेंबर रोजी देशात सगळी रुग्णालये आणि नर्सिंग होम्समध्ये आगीपासून सुरक्षेचे उपाय पाळण्याचे दिशा निर्देश दिले होते.
भंडाऱ्यातील घटनेतून हे स्पष्ट झाले की, रुग्णालय प्रशासनाने केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले असते तर १० मुलांचा जीव वाचला असता. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अँड पब्लिक हेल्थच्या ताज्या अहवालानुसार गेल्या १० वर्षांत देशात रुग्णालयांत आगीच्या ३३ मोठ्या घटना घडल्या. गुजरातमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान रुग्णालयांत आगीच्या सहा घटना घडल्या व त्यात अनेकांचा मृत्यू झाला. अहमदाबादेत श्रेय रुग्णालयात ८ आणि राजकोटमध्ये उदय शिवनंद कोविड रुग्णालयात आग लागून ५ जणांचा मृत्यू झाला होता. या रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकांना अटक झाली होती. ऑगस्ट महिन्यात आंध्र प्रदेशमध्ये विजयवाड़ात कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीत ११ जण मरण पावले होते. या घटनेत व्यवस्थापनातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली होती.
रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या प्रमुख घटना
n ९ डिसेंबर, २०११ - कोलकातात एएमआरआय रुग्णालयात ९० पेक्षा जास्त मृत्यू.
n १३ जानेवारी, २०१३ - बिकानेरमध्ये पी.बी.एम. रुग्णालयात तीन रुग्ण गंभीररित्या भाजले.
n १६ ऑक्टोबर, २०१५ - ओदिशातील कटकमध्ये आचार्य हरिहर रिजनल कॅन्सर सेंटरच्या शस्रक्रिया विभागात आगीत एक ठार ८० रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांत हलवावे लागले.
n १८ ऑक्टोबर, २०१६ - भुवनेश्वरमध्ये एसयूएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू.
n १६ जुलै, २०१७ – लखनौतील केजीएमयूमध्ये २५० रुग्णांच्या जीविताला होता धोका. त्यांना वेळीच दुसऱ्या रुग्णालयांत हलवले गेले.
n २० डिसेंबर, २०१८ - मुंबईत ईएसआयसीत आठ जणांचा मृत्यू. १४० पेक्षा जास्त जखमी.
n २३ जानेवारी, २०१९ - छत्तीसगडमध्ये छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सन्मध्ये आग लागून तीन रुग्ण गंभीररित्या भाजले आणि ४० मुलांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवले गेले.
n ६ ऑगस्ट, २०२० - अहमदाबादेत श्रेया रुग्णालयात ८ रुग्णांचा मृत्यू.
n २७ नोव्हेंबर, २०२० - राजकोटमध्ये उदय शिवानंद रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू. पाच महिन्यांत गुजरातमध्ये रुग्णालयात आगीच्या सात घटना घडल्या.