रुग्णालयात यापुढे चालणार नाही नट्टापट्टा, नवीन ड्रेसकोड लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:23 AM2023-02-12T06:23:49+5:302023-02-12T06:24:33+5:30
हरयाणामध्ये कर्मचाऱ्यांना ड्रेस काेड लागू
लाेकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : रुग्णालयात यापुढे नट्टापट्टा चालणार नाही. लांब नखे, महागडे दागिने, मेकअप, आकर्षिक हेअरस्टाईल, स्कर्ट, जीन्स अशी वेशभूषा असल्यास गैरहजेरी लावण्यात येईल. ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे हरयाणामध्ये. तेथे डाॅक्टर, परिचारिका व इतर आराेग्य कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ड्रेस काेड लागू केला आहे.
आराेग्य मंत्री अनिल वीज यांनी सरकारच्या ड्रेस काेड धाेरणाची माहिती दिली. आराेग्य विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचारी, पॅरामेडिकल, स्वच्छता, सुरक्षा, परिवहन, टेक्निकल तसेच कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना युनिफाॅर्म बंधनकारक करण्यात आला आहे. याशिवाय केशसज्जादेखील ठरविण्यात आली आहे. पुरुषांना काॅलरपेक्षा जास्त लांब केस ठेवता येणार नाहीत, तर महिलांना महागडे दागिने, मेकअप, आदी वापरता येणार नाही. त्यांना लांब नखेदेखील ठेवण्यास बंदी घातली आहे.
या कपड्यांवर बंदी
काेणत्याही रंगाची जीन्स, डेनिम स्कर्ट, ड्रेस, स्वेट शर्ट, केपरी, डिप नेक टाॅप, कमरेपेक्षा लहान टाॅप, स्कीन टाईट पॅंट, आदी घालता येणार नाही.
ड्रेस काेड कशासाठी?
महिला कर्मचारी प्लाझाे, शाॅर्ट कुर्ता, घट्ट कपडे घालून येत हाेत्या, तर पुरुष कर्मचारी जीन्स, टी-शर्ट, स्पाेर्ट्स किंवा लाेफर शूज घालून येत हाेते. त्यामुळे रुग्णालयात फॅशन नव्हे, तर शिस्त दिसायला हवी. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांमध्ये फरक दिसायला हवा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे आराेग्य मंत्र्यांनी सांगितले.