शाब्बास पोरा! दिवसा काम, रात्री अभ्यास; हॉटेलचा वेटर झाला तहसीलदार, अशी आहे सक्सेस स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:50 AM2023-07-16T10:50:00+5:302023-07-16T10:51:17+5:30
वेटर ते तहसीलदार या प्रवासात अनेक अडथळे आले पण हिमांशू जिद्दीने लढला. प्रत्येक वेळी हिमांशूने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि यूपीमध्ये पीसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली.
हरियाणाच्या बहादूरगडच्या जाखौदा मोड बायपासवर असलेल्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा हिमांशू उत्तर प्रदेशमध्ये आता तहसीलदार झाला आहे. वेटर ते तहसीलदार या प्रवासात अनेक अडथळे आले पण हिमांशू जिद्दीने लढला. प्रत्येक वेळी हिमांशूने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि यूपीमध्ये पीसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्या यशामुळे हॉटेलचे कर्मचारी आणि कुटुंबीय खूप आनंदी आहेत. त्याचे हॉटेलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
हॉटेल मालक सुनील खत्री आणि विकास खत्री यांनीही हिमांशूचे अभिनंदन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल कर्मचाऱ्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. हिमांशू हा उत्तर प्रदेशातील कानपूर शहराजवळील औरैया येथील रहिवासी आहे. वडील रेल्वेत कर्मचारी होते. काही काळापूर्वी त्यांचे निधन झाले. हिमांशूला दोन लहान भाऊही आहेत. जे सध्या शिक्षण घेत आहेत. हिमांशूने शिक्षणानंतर कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. यापूर्वी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात काम केले आहे. त्यानंतर तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करू लागला. मात्र, आपण वेटरचे काम करतो, असे त्याने कधीही घरी सांगितले नाही.
हिमांशूच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा त्याला कांदा भाकरी खाऊनच झोपावे लागले, पण त्याने कधीच हार मानली नाही. आपले ध्येय कधीही ढळू दिले नाही. हिमांशू सांगतो की तो दिवसा काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आणि मालकानेही त्याला अभ्यास आणि कुटुंब चालवण्यात खूप मदत केली आहे. वेटर ते तहसीलदार या प्रवासात हिमांशूने जेवण देणे, टेबल साफ करणे, भांडी धुणे अशी कामे केली. त्याने कधीही कोणतेही काम लहान-मोठे मानले नाही.
सुनील खत्री यांनी सांगितले की, हिमांशू खूप उत्साही आणि मेहनती तरुण आहे. तो कधीही कामापासून दूर गेला नाही. नेहमी हसतमुखाने सर्व काही केलं आणि अभ्यासही सुरू ठेवला. हिमांशूचे जीवन आणि यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले. हिमांशूने एम.कॉम.चे शिक्षण घेतले आहे. आधी सैन्यात भरती व्हायचे होते, पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून आता हिमांशू यूपीएससी उत्तीर्ण करून पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.