अयोध्येतील हॉटेलचे भाडे गगनाला भिडले; 22 जानेवारी रोजी एका रुमचा किराया 1 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:01 PM2024-01-10T22:01:00+5:302024-01-10T22:01:51+5:30
Hotels in Ayodhya: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे.
Ram Mandir: प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्यात रामललाची प्रतिष्ठापणा 22 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी प्रशासन अनेक दिवसांपासून जय्यत तयारीला लागले आहे. मंदिर उद्घाटनाच्या दिवशी लाखो भाविक अयोध्येत येणार आहेत. अशातच अयोध्येतील हॉटेलमधील रुम्सचे भाडे (Ayodhya Hotels Room Price) गगनाला भिडले आहे.
राममंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येतील हॉटेल रुमचे बुकिंग 80 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळेय येथील काही हॉटेलचे दर पाच-सात पटीने वाढले आहेत. काही आलिशान हॉटेलमधील रुमचे एका दिवसाचे भाडे एक लाख रुपयांवर गेले आहे. विशेष म्हणजे रुमच्या भाड्यात एवढी मोठी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग दररोज वाढत आहे.
लाखो भाविक येणार
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशभरातून सुमारे 3 ते 5 लाख लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत अयोध्येतील बहुतांश हॉटेल्स आधीच भरलेली आहेत आणि ज्या हॉटेलमध्ये या तारखांसाठी खोल्या उपलब्ध आहेत, त्यांच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
हॉटेलच्या खोलीचे भाडे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 22 जानेवारी रोजी सिग्नेट कलेक्शन हॉटेलमधील खोलीचे भाडे 70,240 रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत येथील भाडे 16,800 रुपये होते. रामायण हॉटेलमध्येही एका खोलीचे भाडे 40,000 रुपये झाले आहे. जानेवारी 2023 मध्ये येथील भाडे 14,900 रुपये होते. हॉटेल अयोध्या पॅलेसमधील भाडेही 18,000 रुपयांवर गेले आहे.
हॉटेलचे भाडे एक लाख
नुकत्याच उघडलेल्या पार्क इन रॅडिसनमधील सर्वात आलिशान खोलीचे भाडे एक लाख रुपये झाले आहे. रिपोर्टनुसार, रामायण हॉटेलमध्ये 20 ते 23 जानेवारीपर्यंत हॉटेल्स बुक झाले आहे. शिवाय, फेब्रुवारी आणि मार्चमध्येही 80 टक्के बुकिंग झाले आहे.