दुधाच्या जिल्ह्यात गरमागरम लढती, सर्वाधिक एनआरआय असलेल्या खेडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:16 AM2022-11-30T10:16:07+5:302022-11-30T10:16:32+5:30
सर्वाधिक एनआरआय असलेल्या खेडा, आणंदमध्ये उत्कंठावर्धक सामने
यदु जोशी
आणंद : अनिवासी भारतीयांचा (एनआरआय) हब असलेल्या आणि देशात अमूल दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या आणंद जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचा प्रभाव दिसत नाही. जवळपास थेट लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्येच. बाजूच्या खेडा जिल्ह्यात अमूलच्या अध्यक्षांचा मुलगा भाजपचा उमेदवार असल्याने या लढतीला गमतीने अमूल कूल नव्हे, तर अमूल हॉट म्हटले जात आहे.
दर दहा घरांआड एकजण परदेशात असलेली असंख्य गावे अहमदाबाद ते बडोद्यादरम्यान आहेत. खेडा आणि आणंद हे तर त्यासाठी विशेष प्रसिद्ध. एनआरआय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बिग फॅन. ते भाजपचा प्रचार करताना दिसतात. खेडा असो की आनंद ही काँग्रेसची फिक्सड वोट बँक आहे त्यामुळेच भाजपला संघर्ष करावा लागत आहे. अमूल डेअरीचे चेअरमन रामसिंग परमार यांचे पुत्र योगेंद्रसिंग हे ठासरा येथे भाजपचे उमेदवार आहेत. रामसिंग पाच वेळा काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी २०१७ पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, ते लढले, पण पडले. आता योगेंद्रसिंग हे वडिलांच्या पराभवाचा बदला काढण्याच्या जिद्दीने विद्यमान आमदार कांतीभाई पटेल (काँग्रेस) यांच्याशी दोन हात करत आहेत. सोजित्रामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार व उमेदवार पूनममाधा (परमार) यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष विपुल पटेल यांचे कडवे आव्हान आहे. पटेल दोनवेळा फार कमी मतांनी हरले होते. आणंद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कांतीभाई परमार यांना लोकांची अधिक पसंती दिसते. भाजपने योगेश पटेल हा नवा चेहरा दिला आहे.
राष्ट्रवादीला विजयाची खात्री
आपल्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तर गुजरातमध्ये अध्यक्ष आहेत जयंत पटेल. ते बॉस्की या टोपणनावाने ओळखले जातात. काँग्रेसने आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सोडली आहे. गेल्यावेळी दोन्ही पक्ष वेगळे लढले होते. दोघांच्या मतांची यावेळी बेरीज झाली तर बॉस्की नक्कीच जिंकतील, असे बोलले जाते.
दर्गा, मंदिराचा कळस यावरून राजकारण
गोधरा जिल्ह्यातील पावागढ हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. गडावरील या मंदिराला कळस नव्हता. कारण वर दर्गा होता. त्यामुळे मोठा आक्रोश भक्तांमध्ये होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार दर्गा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला आणि मंदिरदेखील भव्य बनवण्यात आले. हा मुद्दा भाजपने निवडणुकीत केला आहे.