बलात्कारी राम रहीमच्या घरात चोरी, घराची भिंत फोडून चोरांनी दागिने आणि कपडे केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 02:06 PM2017-10-02T14:06:49+5:302017-10-02T14:08:01+5:30
बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या घरी चोरी झाली आहे. बहादूरगढमधील मेंहदीपूर डबोडा परिसरात असणा-या राम रहीमच्या नाम चर्चा घरमध्ये घुसून चोरांनी हात साफ केले.
चंदिगड - बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या घरी चोरी झाली आहे. बहादूरगढमधील मेंहदीपूर डबोडा परिसरात असणा-या राम रहीमच्या नाम चर्चा घरमध्ये घुसून चोरांनी हात साफ केले. चोरांनी घरफोडी करत राम रहीमचे कपडे आणि महागड्या वस्तू चोरल्या आहेत. डबोडा गावात राहणारा राम रहीमचा भक्त जयपालने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून तपास सुरु केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही चोरी झाली आहे. घराची देखभाल करण्याची जबाबदारी जयपालवर होती. शनिवारी घरामधील पसिरात पोहोचला असता त्याला चोरी झाल्याची माहिती मिळाली. भिंत फोडून चोर घरात घुसले होते. नेमके किती चोर घरात घुसले होते याबाबत काही माहिती मिळालेली नाही.
कपड्यांची होत असे पूजा
जयदीपने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा घरातील परिसरात तो पोहोचला तेव्हा सर्व टाळे तोडण्यात आले असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ज्या कपड्यांची राम रहीमचे भक्त पूजा करत असतात, ते कपडे घेऊन चोर पसार झाले. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, हार्ड डिस्क, डीव्हीआर सिस्टम, कॉम्प्युटर्स आणि अन्य महागड्या वस्तू चोरी झाल्या आहेत. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम आणि इतर व्हीव्हीआयपींसाठी तयार करण्यात आलेल्या रुमममधील सामानावरही चोरांनी डल्ला मारला.
25 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारानंतर डीजीपींनी स्थानिक प्रशासनाला नाम चर्चा घराकडे न जाण्याचा आदेश दिला होता. यानंतर नाम चर्चा घराला टाळं ठोकण्यात आलं होतं. तेव्हापासून ही जागा समर्थकांसाठी बंद करण्यात आली होती. 25 ऑगस्टनंतर या ठिकाणी सत्संग करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. जयपालला केअरटेकर म्हणून येथे ठेवण्यात आलं होतं. तो नेहमी नाम चर्चा घरमध्ये येत असे आणि साफसफाई करायचा.
बहादूरगढ पोलिसांनी आम्ही तपास सुरु केला असून, फॉरेन्सिक आणि क्राइम टीम तपास करत असल्याचं सांगितलं आहे. एखाद्यावर संशय असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. लवकरच आम्ही चोरीचा उलगडा करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.