घर सांभाळणाऱ्या महिलेचा पतीच्या मालमत्तेत समान वाटा, मद्रास हायकोर्टाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 08:02 AM2023-06-26T08:02:53+5:302023-06-26T08:03:07+5:30
Court: गृहिणी घराची काळजी घेते. पतीला घराची चिंता न करता कामासाठी बाहेर पडण्यास मदत करून, अप्रत्यक्षपणे उत्पन्नात योगदान देते. त्यामुळे ती पतीच्या मालमत्तेत समान वाटा मिळण्यास पात्र आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे.
- डॉ. खुशालचंद बाहेती
चेन्नई - गृहिणी घराची काळजी घेते. पतीला घराची चिंता न करता कामासाठी बाहेर पडण्यास मदत करून, अप्रत्यक्षपणे उत्पन्नात योगदान देते. त्यामुळे ती पतीच्या मालमत्तेत समान वाटा मिळण्यास पात्र आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे.
कन्नयन नायडू आणि भानुमती यांचे लग्न झाले. पुढे कन्नयन सौदी अरेबियात नोकरीसाठी गेले. भानुमती मुलांसह येथेच राहिली. भानुमतीला स्वतःचे कोणतेही उत्पन्न नव्हते. सौदीहून पतीने पाठवलेल्या पैशातून तिने दागिने आणि काही स्वतःच्या नावावर, तर काही पतीच्या नावाने मालमत्ता खरेदी केल्या.
परतल्यानंतर दाम्पत्यामध्ये वाद झाला. पतीने भानुमती यांना सर्व मालमत्ता त्याच्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिनेही मागितले. भानुमती यांनी यास विरोध केला आणि मालमत्तेत समान वाटा मागितला. प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, कन्नयन यांनी युक्तिवाद केला की, भानुमतीला स्वतःचे उत्पन्न नाही. सर्व काही त्यांच्या पैशाने विकत घेतले आहे. सौदी अरेबियातून पती सर्व मालमत्तेचे खरे मालक तेच आहेत. भानुमती यांनी मात्र पत्नी म्हणून संपत्तीवर तिचा ५० टक्के अधिकार असल्याचा दावा केला.
गृहिणी अप्रत्यक्षरीत्या का असेना, तितक्याच प्रमाणात कुटुंबाला हातभार लावते. ती घराची काळजी घेते. पती- पत्नीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संयुक्त योगदानाद्वारे मालमत्ता संपादन केली असल्यास, दोघांना समान वाटा मिळण्याचा हक्क आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने भानुमतीच्या बाजूने निकाल दिला.
गृहिणीच्या योगदानाला मान्यता देणारा कोणताही कायदा भारतात आतापर्यंत नाही. परंतु न्यायालय अशा योगदानाला मान्यता देते. पती आणि मुलांची काळजी घेण्यासाठी पत्नी स्वतःला वाहून घेते. तिला स्वतःचे म्हणता येणारे काहीही नसणे हे अन्यायकारक आहे. -न्यायमूर्ती कृष्णन रामासामी