बापरे! 5 हजारांच्या विजेच्या बिलाऐवजी जमा झाले 1 अब्ज 97 कोटी रुपये; उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 02:57 PM2023-12-01T14:57:46+5:302023-12-01T15:01:41+5:30
तरुण 5000 रुपये वीजबिल जमा करण्यासाठी आला होता पण त्यावेळी गोंधळ झाला. यावेळी 1 अब्ज रुपयांहून अधिकचे वीज बिल जमा झालं आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण 5000 रुपये वीजबिल जमा करण्यासाठी आला होता पण त्यावेळी गोंधळ झाला. यावेळी 1 अब्ज रुपयांहून अधिकचे वीज बिल जमा झालं आहे. हे वाचल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या घटनेने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला, त्यानंतर ही चूक सुधारण्यात आली.
गोरखपूरच्या ग्रामीण वितरण विभाग II च्या नौसड उपविभागातील घराचे वीज बिल जमा करण्यासाठी छोहाडी देवी यांचा मुलगा काउंटरवर पोहोचला होता. छोहाडी देवीच्या मुलाने बिलाची थकबाकी 4950 रुपये जमा केली आणि पावती घेऊन घरी परतला. विभागाने त्यांना दिलेल्या वीज बिल भरणा पावतीमध्ये कनेक्शन आयडी रक्कमच्या कॉलममध्ये 10 अंक लिहिले.
बिल भरल्यानंतर विभागाकडून हिशोबांची जुळवाजुळव सुरू असताना ही चूक लक्षात आली. 1 अब्ज 97 कोटी रुपयांचे बिल कोणीतरी भरल्याचं वीज विभागातील कर्मचाऱ्यांना वाटलं. लखनौमध्ये बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी नेमका प्रकार विचारला.
वीज महामंडळाच्या ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे आणि यंत्रणेतील त्रुटींमुळे एका ग्राहकाकडून 1 अब्ज 97 कोटी रुपयांचं बिल जमा झाल्याचं तपासात समोर आलं आहे. समस्या निदर्शनास आल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ती सोडविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू ठेवले. यानंतर, लखनौ येथील शक्ती भवनच्या डेटा सेंटरकडून सूचना मिळाल्यानंतर ते पेमेंट रद्द करण्यात आले.
या गोंधळाबाबत गोरखपूरमधील वीज वितरण विभागाचे मुख्य इंजिनिअर आशु कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुकून कॅशियरने रकमेऐवजी अकाऊंट नंबर टाकला, जो दहा अंकी आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली, ही मानवी चूक होती जी नंतर दुरुस्त करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.