एक कोटी घरे २०२२ मध्ये नव्हे, पुढील वर्षीच देणार, गृहनिर्माणमंत्री पुरी यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 04:56 AM2019-06-27T04:56:31+5:302019-06-27T04:57:48+5:30
शहरी भागांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक कोटी घरे दोन वर्षे आधीच उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
नवी दिल्ली : शहरी भागांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक कोटी घरे दोन वर्षे आधीच उपलब्ध करून दिली जाणार आहेत. २०२२ मध्ये ही एक कोटी घरे बांधून पूर्ण केली जाणार होती, ती आता २०२० मध्ये उपलब्ध होतील, अशी घोषणा मंगळवारी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने केली.
केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, आवश्यक त्या संख्येतील घरांना पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मंजुरी मिळेल आणि बांधकाम वर्षअखेर पूर्ण होईल असा मला आत्मविश्वास आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले होते की, ‘सर्वांसाठी घर हे स्वप्न साकारण्यासाठी सर्व ते उपाय केले जातील. घरांमुळे कोट्यवधी आकांक्षांना पंख लाभतील.’
हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, एक कोटी घरांची मागणी असून, त्यापैकी ४.८३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या ८१ लाखांपेक्षा जास्त घरांना मंजुरी मिळाली आहे. पीएमएवाय योजनेत के्रडिट लिंकड् सबसिडीअंतर्गत ६.३२ लाख कुटुंबांनी व्याज अनुदानाचा लाभ घेतला
आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पांना केंद्रातून परवानगी दिली जायची. आम्ही मात्र राज्यांना एका टेबलवर आणून प्रगती साधली आहे. सहकाराचे संघराज्यीय उदाहरण आम्ही प्रत्यक्ष घडवले आहे, असे पुरी म्हणाले.
पायाभूत सुविधा आणखी सुधारणार
मोदी म्हणाले की, ‘‘माझे सरकार शहरी भागातील पायाभूत सुविधांना आणखी सुधारण्यास बांधील आहे.’’ त्यांनी गेल्या चार वर्षांत शहरांचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, अमृत आणि स्मार्ट सिटीज मोहिमांचा उल्लेख केला.