सरकारविरोधी भूमिका मांडणारा देशद्रोही कसा?- अमोल पालेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:27 AM2020-02-03T03:27:05+5:302020-02-03T06:26:41+5:30
आंदोलनांची दखल न घेणे अधिक वेदनादायी; अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज
- नितीन नायगांवकर
नवी दिल्ली : माझ्याकडे सत्ता आहे आणि लोकांनी मला निवडून दिले आहे त्यामुळे माझे मत मी ठणकावून सांगतो; पण लोकांचे मत त्यापेक्षा वेगळे असेल तर ते बोलून दाखविण्याचा अधिकार त्यांना आहे. सरकारविरोधी अर्थात सरकारपेक्षा वेगळे मत मांडले तर ती भूमिका देशविरोधी आणि भूमिका मांडणारा देशद्रोही कसा ठरविला जातो, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी उपस्थित केला.
भारत रंग महोत्सवाच्या निमित्ताने अमोल पालेकर दिल्लीत होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. अतिशय शांततेत, पण स्पष्ट शब्दांमध्ये आपले मत मांडणाऱ्या मोजक्या नटांमध्ये अमोल पालेकर यांचा समावेश होतो. देशात वेगवेगळ्या मुद्यांवरून सुरू असलेल्या आंदोलनांबद्दलही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणतात, ‘हिंसक आंदोलनांची चर्चा होतेय; पण शांततापूर्ण आंदोलनेही सुरू आहेत. त्यांची दखल का घेतली जात नाही? सातत्याने आंदोलने होत असतील आणि या आंदोलनांचे नेतृत्व आजचा तरुण करीत असेल, तर किमान दखल तरी घ्या. अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे; पण तसे होताना दिसत नाही हे अधिक वेदनादायी आहे.
आंदोलन झाले की ते डाव्यांनी केले, या पक्षाने केले, त्या पक्षाने केले, अशी त्याची समीक्षा होते. आंदोलन कुणालाही करू द्या; पण विरोध होत आहे, हे महत्त्वाचे नाही का?’ दोन दिवसांपूर्वी एक माणूस गोळ्या झाडत असताना पोलिसांची फौज निमूटपणे उभी होती. यातून दडपशाहीची वेगवेगळी रूपं आपण पुढे आणतोय का, असा प्रश्नही ते उपस्थित करतात. एकूण परिस्थिती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नावर उभी आहे, असे ते म्हणाले.
‘एनजीएमएमध्ये ‘तुम्ही हे बोलू नका’ असे पालेकरांना सांगणे म्हणजे काय आहे? ‘या जागी बोलणे योग्य नाही’ असे म्हणून आपणच पुन्हा त्याला फाटे फोडता. सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित मार्गाने आपण जोपर्यंत चर्चा करीत नाही, तोपर्यंत काहीतरी चुकतेय असे समजायला हरकत नाही,’ असेही ते म्हणाले.
‘पक्ष आणि राजकारण मुद्दाच नाही’
‘मी कुठल्याही व्यवस्थेपुढे मान टेकवली नाही. आयुष्यभर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढत आलो. आणीबाणीविरुद्धही लढलो, न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या सरकारच्या विरोधात लढा दिला. पक्ष आणि राजकारण हा कधीही माझा मुद्दा नव्हता आणि नसेल. सुजाण नागरिक या नात्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुठे संकोच होत असेल तर मी शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करीत राहणार,’ असेही पालेकर यांनी स्पष्ट केले.