...अन् तब्बल ७ हजार जणांचा जीव वाचला; रावत यांच्या संघर्षाची, साहसाची थरारक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:57 AM2021-12-09T11:57:08+5:302021-12-09T11:58:29+5:30
देशासोबतच देशाबाहेरही अतुलनीय शौर्य गाजवणारा सेनापती काळाच्या पडद्याआड
मुंबई: देशाचे पहिली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९ मध्ये स्वातंत्र्य दिनी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली. त्यानंतर रावत यांची पदावर नियुक्ती करण्यात आली. सैन्याच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीनं त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. डिसेंबर २०१९ मध्ये रावत यांनी सीडीएस म्हणून जबाबदारी स्वीकारली.
देशासोबतच देशाबाहेरही बिपिन रावत यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. अशांत परिसरात उत्तम सेवा देणारे अधिकारी ही त्यांची ओळख. परदेशांमध्येही त्यांनी त्यांचं नेतृत्त्व कौशल्य दाखवून दिलं. १३ वर्षांपूर्वी अशांत कांगोमध्ये ते कार्यरत होते. संयुक्त राष्ट्राच्या शांतता फौजेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यांनी या फौजेचा चेहरामोहरा बदलला.
रावत यांना कांगोत तैनात करण्यात आलं त्यावेळी तेथील शांतता फौजेकडे लोक संशयानं पाहायचे. लोकांच्या डोळ्यांत सैन्याबद्दलचा राग स्पष्ट दिसायचा. सैन्य येऊन आपल्या आयुष्यात काहीच बदल झालेला नाही, अशी लोकांची मानसिकता होती. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक व्हायची.
ऑगस्ट २०१८ मध्ये रावत कांगोमध्ये पोहोचले. त्यावेळी ते ब्रिगेडियर होते. त्यांनी परिस्थिती लक्षात घेतली. नव्यानं काम सुरू केलं. बंडखोरांना वेसण घालण्यासाठी रावत यांच्या नेतृत्त्वाखालील सैन्यानं बळाचा वापर सुरू केला. अशांत परिसरात मशीनगन्स आणि तोफा तैनात केल्या. सर्वसामान्य नागरिकांची सुटका केली आणि बंडखोरांनावर हल्ले करण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा कौशल्यपूर्ण वापर केला.
लोकांच्या मनात असलेले सैन्याबद्दलचे गैरसमज दूर झाले. त्यांच्या मनात आशा निर्माण झाली. कांगो सैन्य आणि बंडखोर यांच्यामध्ये गोळीबार सुरू असताना ७ हजार जण अडकून पडले. सामान्य लोकांचा जीव धोक्यात सापडला. त्यांची यशस्वी सुटका रावत यांच्या नेतृत्त्वाखालील सैनिकांनी केली. यानंतर बंडखोरांचं वास्तव्य असलेले अड्डे सैन्याच्या हेलिकॉप्टर्सनी उद्ध्वस्त केले. लोकांच्या मनात सैन्याबद्दल आदराची भावना निर्माण करण्यात रावत यशस्वी ठरले.