आसाममध्ये बसून आमदार नेता कसा काय निवडू शकतात? सिब्बल यांचे कोर्टात एकामागून एक १० रोखठोक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:47 PM2023-02-21T12:47:23+5:302023-02-21T12:47:50+5:30
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
नवी दिल्ली-
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टात आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आजपासून सलग तीन दिवस सुनावणी चालणार आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आपली बाजू मांडत असून त्यांनी आपल्या युक्तिवादात प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. बहुमत असल्याचा दावा करणारे आमदार आसाममध्ये बसून आपला नेता कसा काय निवडू शकतात? असा सवाल उपस्थित करत कपिल सिब्बल यांनी वर्मावर बोट ठेवलं आहे. तसंच बहुसंख्य सोडा आपण अल्पसंख्य आमदार होते असं आपण म्हणू पण ते राज्याबाहेर जाऊन आम्हीच खरा मूळ पक्ष असा दावा करू शकतात का? असा रोखठोक सवाल कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर उपस्थित केला आहे.
कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादात राज्यपालांच्या भूमिकेबाबतची प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच राज्यपालांनी घटनेच्याबाहेर जाऊन काम केल्याचाही दावा केला आहे. "एखाद्या पक्षाकडे बहुमत आहे की नाही याची कल्पना देखील नसताना अगदी पहाटे राज्यपाल शपथविधी कसा काय घेऊ शकतात? हे अलीकडच्या काळात दिसून आलं आहे की देशाच्या राजकारणात राज्यपालांचा सक्रिय सहभाग आहे, हे दुर्दैव आहे", असं कपिल सिब्बल म्हणाले.
कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात उपस्थित केलेले १० सवाल
१. बहुमत असल्याचा दावा करणारा राजकीय पक्ष व्हीप बदलू शकतो का?
२. पहाटे राज्यापालंकडे दावा केला जातो आणि शपथ दिली जाते. राज्यपालांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदाऱ्यांच्या पलिकडे जाऊन काम केलेलं नाही का?
३. विधीमंडळ पक्षात फूट नसून राजकीय पक्षातील फूट आहे दावा केवळ बचावात्मक असून एक तृतियांश बहुमत असलेले लोकप्रतिनिधी संपूर्ण पक्षावर दावा करू शकतात का?
४. निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं की, आमच्याकडे तुमच्या पक्षाची घटना नाही. त्यामुळे आम्ही फक्त विधानसभेतील बहुमताने निर्णय देतोय आणि एकनाथ शिंदे यांना चिन्ह देत आहोत, असं करता येतं का?
५. विधीमंडळाचा नेता कोण हे आमदार आसाममध्ये बसून कसा काय निर्णय घेऊ शकतात?
६. न्यायालयीन आदेश पारित होण्यापूर्वी जे काही घडत होते ते महाराष्ट्राबाहेर, ईशान्येकडील राज्यात घडत होते. कुणाकडून घडत होते? तर विधानसभेच्या सदस्यांकडून. यात राजकीय पक्षाची कोणतीही बैठक झालेली नाही.
७. राज्याबाहेर जाऊन पक्षातील बहुसंख्य आमदार तिथं बसून पक्षावर दावा करू शकतात का?
८. फुटलेले आमदार जर शिवसेनेचे सदस्य आहेत. तर पक्षाचा व्हीप झुगारून ते शिवसेनेविरोधात भाजपाच्या उमेदवाराला मतदान कसं काय करू शकतात?
९. विधी मंडळ पक्षातील फुटलेले सदस्य थेट पक्षात फूट पडल्याचं सांगून घटनेच्या १० सूचीतील नियम मोडीत काढू शकतात का?
१०. पक्षांतर्गत वादाची समीक्षा कोर्टाकडून केली जाऊ शकते का?