"देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे? अत्याचारी खासदाराला भाजपाचे संरक्षण?", पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 06:06 PM2023-06-02T18:06:05+5:302023-06-02T18:08:25+5:30
Prithviraj Chavan: पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आल्यानंतरही भाजपा खासदारा बृजभूषणला अटक होत नाही. देशाची जगात बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प आहेत हे त्याहून गंभीर आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंहला तात्काळ अटक झाली पाहिजे
मुंबई - रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. असे असतानाही भाजपा खासदारा बृजभूषणला अटक होत नाही. देशाची जगात बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प आहेत हे त्याहून गंभीर आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंहला तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अद्याप कारवाई होत नसल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भाजपाच्या महिला नेत्यांनी या प्रकरणी पुढे येऊन पीडित खेळाडूंना समर्थन दिले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही. महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्या खासदाराला वाचवण्यासाठी भाजपा आटापीटा करत आहे, त्याला संरक्षण दिले जात आहे. नवीन संसद भवनचे उद्घाटन होत असताना या पीडीत खेळाडूंना धक्काबुक्की करत पोलीस बळाच्या वापर करत जंतर मंतरवरून हुसकावून लावले. अत्याचारी खासदारावर पोलीस कारवाई करण्याऐवजी पीडितांवरच पोलीस अत्याचार करत आहेत. छोट्या छोट्या प्रसंगावर ट्विट करणारे पंतप्रधान या अतिशय गंभीर प्रकरणावर गप्प आहेत हे आश्चर्यकारक व संतापजनक आहे.
महिला कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी देशभरातून राजकीय पक्ष, संघटना, व्यक्ती पुढे येत असताना बॉलिवूडमधील कलाकार व इतर खेळाडूंनीही पुढे येऊन महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी खंबरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. खेळाडूंच्या पाठिशी उभे नाही राहिले तर अत्याचारी खासदाराला समर्थन दिल्याचा संदेश जाईल, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.