कसा आहे ट्रम्प मुक्कामी असलेला चाणक्य सूट?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 01:57 AM2020-02-24T01:57:00+5:302020-02-24T06:57:41+5:30
दिल्लीतील मौर्या हॉटेलमध्ये अन्न प्रयोगशाळा, जीम, उपकरणे अन् बरंच काही
नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दिल्लीतील मौर्या हॉटेलमध्ये थांबणार असून ज्या सूटमध्ये राहणार आहेत तो चाणक्य सूट अतिशय आलिशान आहे. अन्न प्रयोगशाळा, सुसज्ज सुरक्षा व्यवस्था, आलिशान सुविधा, खासगी रूम, स्पा, जीम अशा नानाविध सुविधा या चाणक्य सूटमध्ये आहेत. दिल्लीतील प्रदूषणाची समस्या लक्षात घेता या हॉटेलमध्ये हवेची गुणवत्ता नियंत्रित करणारी अत्याधुनिक यंत्रे लावण्यात आली आहेत. दोन बेडरूमचा चाणक्य सूट आहे. या सूटला खासगी अभ्यागत कक्ष, खासगी टेरेस, जीम, डायनिंग हॉल, खासगी प्रवेश व्यवस्था, वेगवान सरकते जिने आदी सुविधा आहेत. लाकडी टाइल्स, वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती असलेल्या भिंती, नावीन्यपूर्ण स्वागतकक्ष, प्रशस्त बाथरूम, छोटेखानी स्पा, जिम यांनी हा सूट सजलेला आहे. ५५ इंचाचा टीव्ही, आयपॉड डॉकिंग स्टेशन, अत्याधुनिक उपकरणे येथे सज्ज आहेत.
या सूटमध्ये डोनाल्ड आणि त्यांच्या पत्नी मेलानिया हे राहणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची कन्या इवांका आणि जावई जारेड कुश्नेर हे सुद्धा असणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळही राहणार आहे.
अमित शहांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
ट्रम्प यांच्या भेटीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी अहमदाबादमध्ये दाखल झाले व त्यांनी शहरामध्ये ट्रम्प यांच्या सर्व कार्यक्रमांसाठी करण्यात येत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सविस्तर आढावा घेतला.