कोविशिल्ड: अशी असेल लसीकरण मोहीम? नोंदणी कशी कराल?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 05:10 AM2021-01-04T05:10:56+5:302021-01-04T05:11:17+5:30
Corona Vaccination : कोविशिल्ड लस पुढील सहा ते आठ महिन्यांत ३० कोटी लोकांना देण्यात येणार आहे. एकूणच लसीकरणाची ही मोहीम कशी चालणार, कोणाला लस प्रथम मिळणार वगैरे प्रश्न निर्माण होत आहेत.
कोविशिल्ड लस पुढील सहा ते आठ महिन्यांत ३० कोटी लोकांना देण्यात येणार आहे. एकूणच लसीकरणाची ही मोहीम कशी चालणार, कोणाला लस प्रथम मिळणार वगैरे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेचा घेतलेला आढावा...
लस प्रथम कोणाला मिळणार?
आरोग्य कर्मचारी
n सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमारे १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल
n कोरोना लसीकरणावरील राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने (एनईजीव्हीएसी) ही शिफारस केली आहे. या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे विविध गटांत विभाजन करण्यात येणार आहे
n आरोग्य कर्मचारी, एकात्मिक बाल विकास सेवा कर्मचारी, परिचारिका आणि पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, सपोर्ट स्टाफ आणि विद्यार्थी
n या सर्वांशी संबंधित डेटा सरकारी आणि खासगी आरोग्य यंत्रणांकडून प्राप्त करण्यात आला आहे आणि कोविन ॲपमध्ये हा डेटा फीड करण्याचे काम सुरू आहे
n कोविन हे ॲप लसीकरण मोहिमेसाठी विकसित करण्यात आले आहे
पालिका कर्मचारी
n कोरोनाकाळात सर्वेक्षण, टेहळणी आणि नियंत्रण या प्रक्रियांशी संबंधित सर्व यंत्रणांच्या सुमारे दोन कोटी कर्मचाऱ्यांना पुढील टप्प्यात लस देण्यात येईल
n त्यात केंद्र आणि राज्य सरकारांमधील पोलीस खाते, सशस्त्र दले, गृहरक्षक, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण संस्था, तुरुंग प्रशासन, पालिका कर्मचारी आणि महसूल कर्मचारी इत्यादींचा समावेश असेल
n या टप्प्यात राज्य सरकारी कर्मचारी तसेच संरक्षण, गृह, गृहनिर्माण आणि नगर विकास या मंत्रालयांच्या कर्मचाऱ्यांनाही लस दिली जाईल
५० वर्ष वयावरील व्यक्ती
n या गटात दोन उपगट करण्यात येतील.
n पहिल्या गटात ६० वर्षांवरील तर दुसऱ्या गटात ५० ते ६० वयोगटातील लोकांचा समावेश
n या वयोगटांतील लोकांची संख्या ठरविण्यासाठी अलीकडेच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदारयाद्यांचा संदर्भ घेतला जाईल
n कोरोनासंसर्गाचे प्रमाण अधिक असलेले क्षेत्र. ज्या भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक होते त्या भागाला लसीकरणात प्राधान्य दिले जाईल
n अशा प्रकारच्या भागांची निश्चिती करण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारांकडे असेल
उर्वरित लोकसंख्या
n वरील सर्व प्रकारच्या लोकांचे सीकरण झाल्यानंतर उर्वरित लोकांना लस दिली जाईल
n किती लोकांना लस द्यायची हे संसर्गाचे प्रमाण व लसीची उपलब्धता यावर अवलंबून असेल
n लसीकरण केंद्रात गर्दीचा अतिरेक टाळण्यासाठी नियोजनबद्ध रीतीने लाभार्थ्यांना लस दिली जाईल
नोंदणी कशी कराल?
लसीकरणाच्या नंतरच्या टप्प्यात स्वनोंदणी प्रारूप उपलब्ध करून दिले जाईल. कोविन वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येईल. सरकारप्रमाणित ओळखपत्र असेल तर ते वेबसाइटवर अपलोड करा.
अथवा आधार ऑथेंटिकेशन करा. बायोमेट्रिक्स, ओटीपी किंवा डेमोग्राफिक पद्धतीने ऑथेंटिकेशन होईल. नोंदणी झाल्यानंतर लसीकरणासाठी तारीख आणि वेळ दिली जाईल.
केवळ पूर्वनोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाईल. कोविन वेबसाइटवरील सत्रव्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल. लाभार्थ्याला कोणत्या सत्रात आणि कोणत्या स्थळी लस मिळेल, हे जिल्हा प्रशासन ठरवेल. कोविनमध्ये इनबिल्ट मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग यंत्रणा असेल