Cyclone Gaja : असं पडलं तामिळनाडूमधील 'गज' चक्रीवादळाचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 02:03 PM2018-11-16T14:03:45+5:302018-11-16T14:08:16+5:30
'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूमध्ये या चक्रीवादळाने कहर केला असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
चेन्नई - 'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूमध्ये या चक्रीवादळाने कहर केला असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ताशी 80 ते 90 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पावसामुळे किनाऱ्याजवळच्या भागात काहीशी पडझड झाली आहे. पुढील 24 तासात गज चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकले होते. गुरुवारी (15 नोव्हेंबर) कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकले. मात्र 'गज' हे नाव कसं देण्यात आलं हे जाणून घेऊया.
Cyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू
गज हा एक संस्कृत शब्द असून यावरून 'गज' चक्रीवादळाला नाव देण्यात आले आहे. गज या शब्दाच्या अर्थ हत्ती असा होतो. श्रीलंकेच्या शास्त्रज्ञांनी तामिळनाडुतील चक्रीवादळाला 'गज' हे नाव दिलं आहे. श्रीलंकेत हत्ती मोठ्या संख्येने असून तिथे हत्तींकडे सन्मानाने पाहिलं जातं. तेथील काही लोकांनी आता हत्तीचं पिल्लू पाळायला सुरुवात केली आहे. यामुळेच शास्त्रज्ञांनी तामिळनाडूतील या वादळाचं नाव 'गज' असे ठेवल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.
जाणून घ्या कशी ठरतात चक्रीवादळांची नावं
भारताच्या समुद्रालगत निर्माण होत असलेल्या वादळांना नाव देताना भारतीय हवामान खाते हे उपखंडातील आठ देशांसोबत संपर्क ठेवत असते. वादळाचे नाव हे सर्वांच्या संमतीने ठरविले जाते. नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या दोन संस्थांकडून 1953 पासून वादळांची नावे ठरविली जातात. नॅशनल हरिकेन सेंटरचे कार्यालय अमेरिकेमधील मियामी येथे आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. दरम्यानच्या काळात उत्तर हिंद महासागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळांना कुठलीच नावे दिली जात नव्हती. यावर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, ओमान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड या आठ देशांनी याविषयी एक बैठक घेऊन 64 नावांची यादी तयार केली आणि प्रत्येक देशात येणाऱ्या वादळांसाठी आठ नावे सुचविण्यात आली. वादळांच्या नावांची यादी प्रत्येक देशाच्या वर्णानुक्रमानुसार आहे. चक्रीवादळांना नाव देण्याचे कारण हे की वादळ पुढे सरकताना राष्ट्रा-राष्ट्रात माहितीची देवाणघेवाण होत असते. देवाणघेवाण होत असतेवेळी एकाच वादळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून संबंधित भौगोलिक प्रदेशातील देशांकडून सामायिकपणे सांकेतिक नावाचा वापर केला जातो.