होऊ दे खर्च... लग्नासाठी ५०० कोटींचा खर्च; नवरी मुलीची साडीच होती कोट्यवधींची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 05:49 PM2023-03-24T17:49:44+5:302023-03-24T17:51:24+5:30
कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा हा विवाहसोहळा होता
लग्न म्हटलं की खर्च आलाच, गरीबातील गरीब माणसालाही लग्नसोहळ्यासाठी खर्च करावाच लागतो. म्हणून तर म्हणतात की माणूस आयुष्यभर पै पै जमा करतो आणि लेकरांच्या लग्नात ती खर्च करतो. कारण, लग्नासाठी काही खर्च हा अपरिहार्य असाच मानला जातो. मात्र, देशातील काही गर्भश्रीमंत लोकांच्या लग्नाची कथाही तितकीच उत्कंठावर्धक असते. मग, ते उद्योगपती अंबानींचं घराणं असो की एखाद्या सेलिब्रिटीचं लग्न असोत. सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, कर्नाटकमधील एका माजी मंत्र्यांच्या मुलीचा लग्नसोहळ्याची आठवण आवर्जुन होतेय. या लग्न सोहळ्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च झालाय. विशेष म्हणजे हे लग्न ७ वर्षांपूर्वी झालं होतं, पण आजही त्याची चर्चा होतेय. कारण, हा देशातील सर्वात महाग लग्नसोहळ्यांपैकी एक होता.
कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा हा विवाहसोहळा होता. या लग्नासाठी तब्बल ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता. ६ नोव्हेंबर २०१६ साली हे लग्न झालं होतं, तब्बल ५ दिवस हा लग्नसोहळा सुरु होता, ज्यामध्ये ५० हजारांपेक्षा अधिक लोकं सहभागी झाले होते. बंगळुरुमधील ५ स्टार आणि ३ स्टार हॉटेलमध्ये जवळपास १५०० पेक्षा जास्त रुम्स बुकींग करण्यात आल्या होत्या. तर, विवाहस्थळी ३ हजारांपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक व पोलीस बंदोबस्त होता.
लग्नात वधुने कांजीवरम साडी परिधान केली होती, ज्याची किंमत १७ कोटी रुपये एवढी होती. साडीवर सोन्याचा थ्रेड वर्क करण्यात आला होता. तर, लग्नासाठी ५ कोटी रुपयांचे दागिने मुलीच्या अंगावर होते. मुलीच्या मेकअपसाठी तब्बल ५० मेकअप आर्टीस्ट आल्या होत्या, त्यासाठी, ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. पाहुण्यांच्या ने-आण करण्यासाठी १५ हेलिकॉप्टर आणि २००० कार उभ्या होत्या. त्यासह ४० भव्य बैलगाडीवरुन पाहुणे मंडळी लग्नमंडपात येत होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका एलईडी स्क्रीनद्वारे देण्यात आली होती. बॉक्स उघडल्यानंतर या स्क्रीवर एक व्हिडिओ चालत होता, जे लग्नाचे निमंत्रण देत होता.
दरम्यान, जनार्दन रेड्डी हे तेव्हा कर्नाटकमधील भाजपचे मंत्री होते. नोटीबंदीनंतर काही दिवसांतच हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या लग्नसोहळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली होती.