दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ अडवाणी यांचा कसा झाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 09:57 AM2024-03-11T09:57:12+5:302024-03-11T09:57:53+5:30
वाघेला, अटलबिहारी वाजपेयी, अमित शाहदेखील जिंकले
विनय उपासनी, लोकमत न्यूज नेटवर्क, गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमधील लोकसभा निवडणूक कायमच आकर्षणबिंदू असते. १९६७ मध्ये अस्तित्वात आलेल्या या लोकसभा मतदारसंघाने १९८९ पासून काँग्रेसच्या हाताची घडी घालत कमळावर बोट ठेवण्याची परंपरा २०१९ पर्यंत कायम ठेवली आहे. शंकरसिंह वाघेला, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, अमित शाह या दिग्गजांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असले तरी अडवाणींचा मतदारसंघ हीच गांधीनगरची खरी ओळख आहे.
राममंदिर आंदोलनाला अडवाणींनी गुजरातेतील सोमनाथपासून सुरुवात केली. मात्र, बिहारच्या पुढे त्यांची रथयात्रा जाऊ शकली नाही. अडवाणींच्या अटकेनंतर १९९१ मध्ये त्यांना गांधीनगर येथून भाजपने लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार जी. आय. पटेल यांना अडवाणींनी सव्वा लाख मतांनी पराभूत केले. १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयींना गांधीनगरातून उमेदवारी देण्यात आली. वाजपेयींनी काँग्रेसचे पोपटलाल पटेल यांचा एक लाख ८८ हजार मतांनी पराभव केला.
वाजपेयी लखनऊ मतदारसंघातूनही उभे होते. त्यामुळे त्यांनी गांधीनगरचा राजीनामा दिला. या लोकसभा निवडणुकीनंतर वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार सत्तेवर होते. १९९८ मध्ये पुन्हा एकदा अडवाणी यांच्याकडेच हा मतदारसंघ सोपविण्यात आला. तेव्हापासून २०१९ पर्यंत या ठिकाणी अडवाणीच पक्षाचे उमेदवार होते.
..अन् अडवाणींनी केला शेषन यांचा पराभव
लोकसभा निवडणूक पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे श्रेय माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्याकडे जाते. याच शेषन महोदयांना काँग्रेसने १९९९च्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगर येथून अडवाणी यांच्याविरोधात उभे केले होते. मात्र, शेषन यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
अमित शाह साडेपाच लाख मताधिक्याने विजयी
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे अमित शाह यांना उमेदवारी दिली. शहांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. सी. जे. छावडा यांचा तब्बल साडेपाच लाख मताधिक्याने पराभव केला. अमित शाह यांनी २००९ पर्यंत गांधीनगरातील निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलली होती. वाजपेयी यांच्या उमेदवारीच्या काळातही शाह यांनीच येथील व्यवस्थापनाचे काम पाहिले होते. शाह सध्या गांधीनगर मतदारसंघाचे खासदार आहेत.