व्यवसाय संकटात तरी ‘ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’ कसे? शरद यादव यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:08 AM2017-11-02T03:08:19+5:302017-11-02T03:09:42+5:30
जनता दलाचे (यु) बंडखोर नेते शरद यादव यांनी देशात उद्योगव्यवसाय संकटात सापडला असताना देशात व्यवसाय करणे सहज (ईज आॅफ डुर्इंग बिझनेस) बनले असल्याच्या सरकारच्या भूमिकेवर बुधवारी टीका केली आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : जनता दलाचे (यु) बंडखोर नेते शरद यादव यांनी देशात उद्योगव्यवसाय संकटात सापडला असताना देशात व्यवसाय करणे सहज (ईज आॅफ डुर्इंग बिझनेस) बनले असल्याच्या सरकारच्या भूमिकेवर बुधवारी टीका केली आहे. जागतिक बँकेने भारताला नुकतेच ‘ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’चे रँकिंग दिले आहे.
शरद यादव यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मोदी सरकार म्हणते की देशात व्यवसाय, व्यापार करणे सोपे झाले आहे परंतु वस्तुस्थिती ही आहे की सगळीकडे व्यापार, व्यवसाय विस्कळीत झाला आहे. सकल देशी उत्पादन (जीडीपी) दोन टक्के कमी झाले असतानाही सरकार जागतिक बँकेची रेटिंग दाखवून आपलीच पाठ थोपटून घेत आहे. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरले आहेत व त्यातून बाहेर पडण्यासाठी किमान दहा वर्षे लागतील, असे यादव म्हणाले.
यादव यांनी सांगितले की, सरकार डिजिटल इंडियाबद्दल बोलते परंतु त्याचवेळी लोक अन्नावाचून मरत आहेत. अन्नधान्याने गोदामे भरलेली आहेत परंतु सरकारच्या धोरणांमुळे लोकांना अन्न मिळत नाही. जनतेला आश्वासने देऊन ती न पाळल्याचा आरोप यादव यांनी केला. आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी धर्माच्या आधारावर फूट पाडली जात आहे व त्यासाठी ताजमहल व टिपू सुलतानसारखे मुद्दे शोधले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे..
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्याविरोधात आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत, असे यादव म्हणाले. निवडणूक चिन्हाबद्दल बोलताना यादव यांनी निवडणूक आयोगाकडे त्यासाठी अपील केल्याचे सांगितले. त्यावर सहा नोव्हेंबर रोजी निर्णय होईल. त्यानंतरच राजकीय धोरण ठरवले जाईल. गुजरातेत भाजपच्याविरोधात सगळ््यांना एकत्र येऊन लढायला पाहिजे.