आता कसं वाटतंय? तुरुंगात असलेल्या चिदंबरमना अमर सिंहांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 01:21 PM2019-09-20T13:21:50+5:302019-09-20T13:23:28+5:30
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
लखनौ - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, खासदार अमर सिंह यांनी न्यायालयीन कोठडीत बंद असलेल्या चिदंबरम यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त करण्याच्या बहाण्याने त्यांना चिमटा काढला आहे. इतिहास स्वत:ची पुनरावृत्ती करतो, असा टोला अमर सिंह यांनी गुरुवारी ट्विटरवरून लगावला.
गुरुवारी संध्या काळी केलेल्या ट्विटमध्ये अमर सिंह म्हणतात,''माझे जुने परिचित असलेल्या पी. चिदंबरम यांच्याबाबत पहिल्यांदाच सहानूभुती वाटत आहे. माझ्यावर मुत्रपिंड प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही काळातच त्यांचे सरकार वाचवले असतानाही त्यांनी माझी तुरुंगात रवानगी केली होती. मी त्याच तुरुंगातील फरशीवर उशीशिवाय झोपलो होतो. आज इतिहास पुन्हा एकदा स्वत:ची पुनरावृत्ती करत आहे. पी. चिदंबरम, आता तुम्हाला कसं वाटतंय?"'
For the 1st time I feel deep sympathy for my old acquaintance @PChidambaram_IN. Inspite of saving his govt right after my kidney transplant I was sent to jail & I slept on the same floor without a pillow. The history is being repeated. How do u feel? #PChidambaram@INCIndia
— Amar Singh (@AmarSinghTweets) September 19, 2019
अमर सिंह यांनी चिदंबरम यांच्यावर आरोप करणारे आपले व्हिडीओ यापूर्वीही प्रसिद्ध केले होते. पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना अनेक कंपन्यांना मनमानी पद्धतीने पैशांचे वाटप केले होते, असा आरोपही अमर सिंह यांनी रुग्णालयातील बेडवरून प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमधून केला होता.
दरम्यान, आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे आणि सामान्य जनतेच्या स्वप्नातील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लोकप्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कधी कल्पना सुद्धा केली नसेल की त्यांना तिहार तुरुंगात राहावे लागेल. मात्र, ते न्यायालयीन कोठडीचे दिवस तिहार तुरुंगात मोजत आहेत.
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांची सीबीआय न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आज विशेष न्यायालयाने पुन्हा चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात वेस्टर्न टॉयलेट, टीव्ही, पुस्तकं, चष्मा आणि औषधेही देण्यात आली आहेत. पी. चिदंबरम यांना या सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी देत पी. चिदंबरम यांना तुरुंगात सुरक्षा पुवण्याचे आदेश दिले होते. पी. चिदंबरम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून ते सीबीआयच्या ताब्यात होते. आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती असून त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.