काेर्टाने सुनावले : ताजमहालबाबत याचिका कसली करता? आधी अभ्यास करून पीएचडी करा, नंतरच आमच्याकडे या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:50 AM2022-05-13T06:50:47+5:302022-05-13T06:51:35+5:30
सर्व मागण्या अमान्य करत याचिका फेटाळली. शनिवारी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल याचिकेत इतिहास स्पष्ट करण्यासाठी ताजमहालच्या बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्याची मागणी केली होती.
लखनौ : “ताजमहाल शहाजहानने बांधला नाही यावर तुमचा विश्वास आहे? आम्ही इथे निकाल देण्यासाठी आलो आहोत का? जसे की तो कोणी बांधला किंवा ताजमहालचे वय किती? तुम्हाला माहीत नसलेल्या विषयावर संशोधन करा, एमए करा, पीएचडी करा, जर कुठली संस्था तुम्हाला संशोधन करू देत नसेल तर आमच्याकडे या. अशा खणखणीत शब्दांत अलाहाबाद हायकोर्टाने याचिकाकर्त्याला चक्क धारेवर धरले.
ताजमहालच्या इतिहासाबाबत सत्य समोर आणण्यासाठी तथ्य गोळा करणारी समिती गठन करावी व ताज परिसरातील २२ खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली. कोणत्या कायदेशीर किंवा संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन होत आहे, हे सांगण्यात याचिकाकर्ता अपयशी ठरला. उद्या उठून न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये येण्याची मागणी कराल, असे खडेबोलही न्यायालयाने सुनावले.
कोणी केली याचिका?
n शनिवारी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल याचिकेत इतिहास स्पष्ट करण्यासाठी ताजमहालच्या बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्याची मागणी केली होती.
n हे १९५१ व १९५८ मधील कायद्यांमधील संविधानाच्या तरतुदींविरूद्ध घोषित करण्याची मागणीही करण्यात आली होती.
n ही याचिका अयोध्या येथील रहिवासी डॉ. रजनीश सिंह यांनी वकील राम प्रकाश शुक्ला व रुद्र वि क्रम सिंह यांच्या माध्यमातून दाखल केली होती.