सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढते? निवडणूक आयुक्तांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:42 IST2025-01-07T15:41:17+5:302025-01-07T15:42:16+5:30
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.

सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढते? निवडणूक आयुक्तांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरे
Election Commission of India : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. पण, ही तारीख जाहीर करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आयोगावर उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. तसेच, ईव्हीएम हॅक केल्याचे आरोप फेटाळून लावले, सायंकाळी 5 वाजेनंतर मतदानाचा टक्का कसा वाढला? याची माहितीही दिली.
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, आजकाल प्रत्येक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदारांमध्ये मिस मॅच झाले, मतमोजणी मंदावली, ईव्हीएम हॅक केले...अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोपही केला जातोय. पण, मतदानाची टक्केवारी कुठे वाढली, याची आम्हालाही माहिती द्या, आम्ही त्याची चौकशी करू.
फॉर्म 17 सी चा अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो
पोलिंग एजंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रातच असतात. ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. सर्व काही त्यांच्या समोर घडते. मतदान संपण्यापूर्वी, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी फॉर्म 17 सी भरला जातो, ज्यामध्ये मतांची संख्या नोंदवली जाते. सेक्टर मॅजिस्ट्रेट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मतदान केंद्राला भेट देतात आणि मतदानाची नोंद घेतात ट्रेंड समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
जगात कुठेही मतदान संपल्यानंतर 6 वाजता लगेचच मतदानाची टक्केवारी दिली जात नाही. 5 वाजल्यानंतर पीठासीन अधिकारी मतदारांना ठिकठिकाणी टोकन देतात. मग शेवटचे मतदान झाल्यानंतर ते पॅक केले जाते. फॉर्म 17 सी भरला जातो. त्याची संख्या लाखात आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो, अशी महत्वाची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली.
हेच लोकशाहीचे सौंदर्य
2020 पासून एकूण 30 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. 15 राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले. हेच मूळात लोकशाहीचे सौंदर्य आहे. निष्पक्ष निवडणुकांचे हेच लक्षण आहेत. यावरून मतदार किती हुशार आहेत, हे स्पष्ट होते. मतदानाच्या सुरुवातीपासून निकाल लागेपर्यंत संपूर्ण पारदर्शकता राखली जाते, असेही ते यावेळी म्हणाले.