कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लस किती प्रभावी ? जाणून घ्या 'या' 5 प्रश्नांची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:28 AM2021-11-29T09:28:56+5:302021-11-29T16:24:43+5:30

Omicron Variant: या नवीन प्रकारात अनेक म्युटेशन होत असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. जगभरातील तज्ज्ञ याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

How effective is the vaccine on new variants of Corona? Find out the answers to these 5 questions | कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लस किती प्रभावी ? जाणून घ्या 'या' 5 प्रश्नांची उत्तरे

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटवर लस किती प्रभावी ? जाणून घ्या 'या' 5 प्रश्नांची उत्तरे

Next

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेने 24 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कोरोनाव्हायरसचा नवीन व्हेरिएंट B.1.1529 बद्दल माहिती दिली. गांभीर्य पाहून डब्ल्यूएचओने दोन दिवसांनी याला 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हटले. तसेच, कोरोनाच्या या नवीन रुपाला 'ओमिक्रॉन' असे नाव देण्यात आले. या नवीन प्रकारात अनेक म्युटेशन होत असल्याने तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, हे उत्परिवर्तन व्हायरसच्या कार्यपद्धतीत बदल करू शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणाकडेही ठोस माहिती नाही. जगभरातील तज्ज्ञ याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या नवीन प्रकाराशी संबंधित पाच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ...

लस किती प्रभावी आहे?

नवीन व्हेरिएंटची लागण झाल्यावरही गंभीर अवस्था किंवा मृत्यूच्या बाबतीत ही लस महत्त्वाची भूमिका बजावत राहील, असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर म्हणतात की, लस SARS-CoV-2 च्या नवीन प्रकारांपासून अधिक म्यूटेशन असलेल्या प्रकरणात अंशतः संरक्षण करेल. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या नवीन ओमिक्रॉन फॉर्मच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 हून अधिक बदल आढळून आले आहेत, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती टाळण्याची क्षमता विकसित करण्यात मदत होऊ शकते आणि त्यामुळे त्याविरूद्ध लसींचा प्रभाव वाढू शकतो. 

हा प्रकार किती धोकादायक आहे?

डब्ल्यूएचओच्या मते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की ओमिक्रॉन हा डेल्टासह इतरांपेक्षा वेगवान आणि गंभीर प्रकार आहे की नाही. डब्ल्यूएचओने सांगितले आहे की दक्षिण आफ्रिकेत या प्रकारामुळे प्रभावित भागात संक्रमित लोकांची संख्या वाढली आहे. अनेक अभ्यासांद्वारे, हे तपासले जात आहे की वाढत्या प्रकरणांचे कारण ओमिक्रॉन आहे की आणखी काही.

जग का घाबरले?

दक्षिण आफ्रिकेत यापूर्वी कमी संक्रमणाची नोंद झाली होती, परंतु ओमिक्रॉनची उत्पत्ती झाल्यापासून दोन आठवड्यांत नवीन प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. तरुणांना संसर्ग होण्यात ओमिक्रॉनचा वेग पाहून आरोग्य संस्थाही आश्चर्यचकित झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या मते, शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास करताना नवीन स्वरुप ओळखले. प्राथमिक अभ्यासानुसार याचा प्रजनन दर 2 आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीपासून दोन लोकांमध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?

या नव्या व्हेरिएंटची सुरुवात झाल्यापासून कोविड-19 च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. सोविटोज बरगवनथ हॉस्पिटलच्या आयसीयूचे प्रमुख रुडो माथिवा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, लोक मध्यम किंवा गंभीर आजाराच्या स्थितीत येत आहेत. काहींना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज पडत आहे. सुमारे 65 टक्के लोक लस न घेतलेले आणि उर्वरित बहुतेक लोकांनी फक्त एक डोस घेतला आहे. 

भारताची तयारी काय आहे?

Omicron च्या दृष्टीने भारत सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यासोबतच जवळपास डझनभर जोखीम असलेल्या देशांची यादी तयार करण्यात आली आहे. या देशांतून भारतात जाणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी घेणे बंधनकारक आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांनुसार, प्रवाशांना विमानतळ सोडण्यासाठी किंवा कनेक्टिंग फ्लाइटमध्ये चढण्यासाठी अहवालाची प्रतीक्षा करावी लागेल. पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांना वेगळे केले जाईल. त्याच वेळी, निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या प्रवाशांना देखील 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि 8 व्या दिवशी त्यांची चाचणी करावी लागेल. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कोविड-19 हेल्पलाइनवर माहिती द्यावी लागेल.

Web Title: How effective is the vaccine on new variants of Corona? Find out the answers to these 5 questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.