मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडी कशी सोडवाल
By Admin | Published: February 11, 2015 11:19 PM2015-02-11T23:19:50+5:302015-02-11T23:19:50+5:30
हायकोर्टाची विचारणा : प्रतिज्ञापत्र देण्याचे समितीला निर्देश
ह यकोर्टाची विचारणा : प्रतिज्ञापत्र देण्याचे समितीला निर्देशनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडी कशी सोडवाल अशी विचारणा विशेष समितीला करून तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत.२९ जानेवारी २०१४ रोजी न्यायालयाने मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी विशेष समिती गठित केली होती. समितीत विभागीय आयुक्त, नासुप्रचे सभापती, महानगरपालिका आयुक्त, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नागपूर येथील अधीक्षक अभियंता व वाहतूक विभागाचे उपायुक्त यांचा समावेश आहे. या समितीने व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) येथील तज्ज्ञांची उपसमिती स्थापन केली होती. तज्ज्ञ समितीने अहवाल देऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी मेहंदीबाग येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे अंडरब्रिजला समांतर दुसरा रेल्वे अंडरब्रिज बांधण्याची सूचना केली आहे. याचिकाकर्त्यांचा याला विरोध आहे. सध्याच्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाऊस आल्यानंतर पाणी साचते. यानंतर येथून तासन्तास अवागमन करता येत नाही. अशा परिस्थितीत दुसरा रेल्वे अंडरब्रिज किती उपयोगी ठरेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने विशेष समितीला तज्ज्ञ समितीचा अहवाल लक्षात घेऊन प्रतिज्ञापत्र मागितले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड़ अनिल किलोर यांनी बाजू मांडली.