अर्थव्यवस्थेला चेतना कशी द्यायची? सरकारमध्येच संघर्ष; अरुण जेटली- नीति आयोगात मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:04 AM2017-10-18T01:04:59+5:302017-10-18T01:05:03+5:30
अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज द्यावे की नाही या मुद्यावर अर्थमंत्री अरूण जेटली आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज द्यावे की नाही या मुद्यावर अर्थमंत्री अरूण जेटली आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. राजीव कुमार यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी सरकारमध्ये आजपर्यंत कोणी न वापरलेल्या (आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज) मार्गाची शिफारस केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
जेटली आणि कुमार यांच्यातील शाब्दिक युद्ध वा रस्सीखेच सरकारमध्ये अगदी जवळून बघितली जात आहे कारण जेटली यांनी अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजन द्यावे हा विषय माझ्यासमोर कधीच नव्हता व तसा शब्दही मी कधी वापरला नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे. जेटली यांनी हे वक्तव्य
१५ आॅक्टोबर रोजी अमेरिकेत
केले होते. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँकेत चर्चा करण्यासाठी ते आठवड्याच्या दौºयावर तेथे गेले होते.
आर्थिक प्रोत्साहनाला तज्ज्ञांचा विरोध
अर्थ मंंत्रालयाने या प्रस्तावाला विरोध केला आहे. कारण, त्यांनी २०१७-१८ साठी आर्थिक तूटीचे लक्ष्य जीडीपीच्या ३.२ टक्के आणि पुढील वर्षासाठी ३ टक्के निर्धारित केले आहे. काही तज्ज्ञांनी या आर्थिक प्रोत्साहनाला विरोध केला आहे. कारण, त्यांना वाटते की, ते आर्थिक एकत्रीकरण योजनेला धोक्यात आणू शकते.