‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘वॉच’ ठेवणार कसा?

By admin | Published: January 25, 2017 09:53 PM2017-01-25T21:53:25+5:302017-01-25T21:53:25+5:30

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नसल्याने नेमका ‘वॉच’ ठेवणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

How to keep 'watch' campaign on 'Whatsapp'? | ‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘वॉच’ ठेवणार कसा?

‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘वॉच’ ठेवणार कसा?

Next

 ‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘वॉच’ ठेवणार कसा?

निवडणूक आयोगाचा इशारा ‘बिनकामाचा’ : यंत्रणाच नाही : ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावरील खर्चाचा हिशेब कसा मांडणार? 
 
योगेश पांडे
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकांत उमेदवारांच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक नजर राहणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. याबाबत राज्यात मनपा पातळीवर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नसल्याने नेमका ‘वॉच’ ठेवणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय ‘सोशल मीडिया’वरील प्रचार जाहिरातीमध्ये मोडणार की काय, याबाबत आयोगाने काहीही स्पष्ट केलेले नाही. एकूणच आयोगाचा हा इशारा बिनकामाचा आहे की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर राजकीय पक्ष करीत आहेत. लोकसभा निवडणुकांपासून हे प्रमाण जास्त वाढीस लागले आहे. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून एकाच वेळी कमी खर्चात जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याने अनेक उमेदवार ‘हाय-टेक’ प्रचारावर भर देणार आहेत. काहींनी यासंदर्भात चक्क खासगी कंपन्यांना कंत्राट दिले असून, कंत्राटाचा आकडा लाखोंमध्ये आहे. 
निवडणूक आयोगाने ‘सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘सायबर सेल’च्या माध्यमातून उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ प्रचारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात ‘फेसबुक’, ‘टिष्ट्वटर’सोबतच ‘व्हॉटस्अ‍ॅप’चा उपयोग मोठ्या प्रमाणात होणार आहे. ‘स्मार्टफोन’धारकांची संख्या व प्रभागातील मतदार लक्षात घेता ‘व्हॉटस्अ‍ॅप’च्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे. अगदी मतदानाच्या दिवशी या माध्यमातून प्रचार सुरू राहण्याची शक्यता आहे. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर नेमक्या कुठल्या संदेशांची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर हे बैठकीत व्यस्त असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
 
पोलिसांकडेही यंत्रणा नाही
नागपूर पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडे एखाद्याच्या ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरून किती संदेश चालले आहे, हे सांगणारी यंत्रणा उपलब्ध नाही. केवळ एखाद्या ‘ग्रुप’वर संदेश आला असेल आणि आपला क्रमांक त्यात असेल तर कुणी संदेश पाठविला, हे कळू शकते. मात्र प्रत्यक्ष वैयक्तिक क्रमांकाचे ‘ट्रॅकिंग’ करणे शक्य नसल्याचे ‘सायबर सेल’चे ‘एपीआय’ विशाल माने यांनी स्पष्ट केले.
 
‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेश पाहणे अशक्य
‘फेसबुक’, ‘टिष्ट्वटर’ इत्यादी ‘सोशल मीडिया’ हे खुल्या ‘प्लॅटफॉर्म’वर असतात. म्हणजेच कुणीही यावरील संदेश, माहिती पाहू शकतो. मात्र ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील संदेश ही अशक्य बाब आहे. ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील व्यक्तिगत संदेश हे ‘एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन’ने संरक्षित केले असतात. म्हणजेच संदेश पाठविणारा व ज्याच्या क्रमांकावर संदेश जात आहे याव्यतिरिक्त इतर व्यक्ती हे संदेश पाहू शकत नाही. शिवाय एखाद्या उमेदवाराच्या नावाने एकाहून जास्त ‘सीमकार्ड’ व स्मार्टफोन असतील तर एकाच वेळी अनेक ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’ तो तयार करू शकतो. अशा स्थितीत मतदानाच्या दिवशी प्रचार सुरू असला तरी त्याला ‘ट्रॅक’ करू शकणार नाही, असे मत सायबर तज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनी व्यक्त केले.
 
‘बल्क मॅसेज’कडेच राहणार लक्ष
यासंदर्भात मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रत्येक उमेदवार ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर काय प्रचार करतो हे पाहणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. आमचा भर हा ‘सोशल मिडीया’च्या सशुल्क सेवांचा उपयोग किती प्रमाणात होतो याकडे राहणार आहे. ‘बल्क मॅसेजेस’ दिसले की आम्ही त्यांचे ‘ट्रॅकिंग’ करु असे त्यांनी सांगितले. मात्र एखाद्या उमेदवाराने खासगी कंपनीला कंत्राट दिले असेल तर हे शोधणेदेखील तारेवरची कसरत ठरणार आहे.
 

Web Title: How to keep 'watch' campaign on 'Whatsapp'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.