नकोसे स्पर्श किती काळ सहन करायचे आणि का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 07:54 AM2023-05-07T07:54:22+5:302023-05-07T07:54:34+5:30
मुद्द्याची गोष्ट : विनयभंग, बॅड टच, अश्लील मेसेजसारखे लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी महिलांनी पुढे यायची गरज तर आहेच, त्यासोबतच किशोरवयीन मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व पुरुषांचे महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. स्त्रीला देहापलीकडे पाहायचे असते, हे जोपर्यंत पुरुषांना उमजणार नाही, तोपर्यंत स्त्रियांना मोठ्या कसोशीने ही लढाई लढावीच लागेल, तीही अगदी प्राणपणाने, बरीचशी स्वतःसाठीच.
प्रा. डॉ. रश्मी पारसकर सोवनी, संस्थापक, ‘वी 4 चेंज’ संघटना
बून बस येताना दिसली आणि स्टॉपवरच्या रोडरोमिओंच्या असह्य त्रासापासून एकदाची मुक्तता मिळतेय या भावनेतून बसमधल्या गर्दीचा जराही विचार न करता रुचिताने (नाव बदललेले नाही) स्वतःला बसमध्ये कोंबले. इथेही छेडछाडीचा दुसरा एपिसोड सुरूच झाला. एका म्हाताऱ्याने तिच्या कमरेला दोन- तीन वेळा ओझरता स्पर्श केला. रुचिता खवळली. वडीलधारी, ज्येष्ठ व्यक्ती जर असे करीत असेल, तर समाजात विश्वास कुणावर ठेवायचा? असे नकोसे स्पर्श किती काळ सहन करायचे आणि का? हे आपण कुठेतरी थांबवायला हवे, असा निश्चय करून रुचिता त्या म्हाताऱ्यावर ओरडली. तेवढ्यात गर्दीत बसायला जागा मिळावी म्हणून रुचिता नाटक करते, असे तिच्या शेजारी उभी असलेली बाई तिला म्हणाली व म्हाताऱ्याला रागावणे सोडून रुचिता तिच्याशीच बाचाबाची करायला लागली.
रुचिताला येतात असे अनुभव आयुष्यात कधीना कधी सर्व स्त्रियांना येत असतात. नकोसा स्पर्श, बॅड टच हा महिलांसाठी सर्वसामान्य अनुभव आहे. नातेवाईक, सहप्रवासी, सहकारी, परिचित, असा कुणाकडूनही बॅड टचचा सामना स्त्रियांना बऱ्याचदा नकळत्या वयापासून करावा लागतो. छेडछाडीपासून बलात्कारापर्यंतच्या अनुभवांना महिलांना नेहमीच सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती कशी हाताळावी याबद्दल त्यांना काहीच ज्ञान नसते. अशा प्रसंगांबद्दल खुली चर्चा घरी, शाळा- कॉलेज किंवा इतर व्यासपीठांवर होत नाही. जमेल तसे अशा प्रसंगांना टाळावे, दुर्लक्ष करावे, असे धोरण स्त्री वर्गाचे असते. आयुष्यात वाट्याला येणाऱ्या नकोशा प्रसंगांची वाच्यता महिला कुठे करत नाहीत. मनाच्या खोल कोपऱ्यात हा अनुभव दाबून ठेवतात. त्यामुळे या विषयावर ‘वी 4 चेंज’ या संघटनेने जेव्हा विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्याचे ठरवले त्यावेळी महिलांना येणाऱ्या नकोशा अनुभवाबद्दल कोणत्याच प्रकारचा डाटा उपलब्ध नाही, असे लक्षात आले. म्हणून ‘वी 4 चेंज’ने कार्यशाळेचे आयोजन करण्याआधी सहसंवेदना सर्वेक्षण करण्याचे ठरवले. सर्वेक्षण दोन वयोगटांतील महिलांमध्ये करण्यात आले. १८ ते २५ वयोगटातील तरुणी व २५ वर्षे ते पुढील वयोगटातील महिला. नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, पुणे, मुंबई, नांदेड, सोलापूर, जालना इत्यादी जिल्ह्यांतील ६०९ महिलांनी फॉर्म भरले, तसेच पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश, अंदमान राज्यातील, तर ऑस्ट्रेलिया, स्वीडन देशात राहणाऱ्या; पण महाराष्ट्रात मूळ असलेल्या महिलांनी सहभाग घेतला. सर्वेक्षणात एकूण २९ प्रश्न विचारले गेले. स्त्री असल्यामुळे तुम्ही असुरक्षित आहात, असे तुम्हाला समाजात कोण सांगते; स्त्री नव्हे तर पुरुष म्हणून जन्माला यायला हवे होते, असे तुम्हाला वाटते का, असे वैयक्तिक प्रश्नही विचारले गेले.
सर्वेक्षणातून महिला विविध प्रकारच्या लैंगिक अत्याचारांचा, शोषणाचा आणि दबावाचा सामना करत असतात हे समोर आले. लैंगिक अत्याचाराच्या घटना सर्रास घडत असतात आणि पाच वर्षांपासूनच आपण मुलींना त्याबद्दल घरातून, शाळेत समज देत असतो. त्यामुळे मुली मोकळेपणाने वागणे विसरल्या आहेत. आजूबाजूचे पुरुष चांगले नाहीत, हे त्यांच्या मनात रुजले आहे. सगळे पुरुष वाईट नसतात, हे त्यांना कसे समजवायचे? ते ओळखायला कसे शिकवायचे? महिलांनी मुक्त वातावरणात तणावाशिवाय जगावे, असे समाजाला प्रकर्षाने जाणवत नाही, ही खरी शोकांतिका आहे.