झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:47 PM2024-10-14T17:47:02+5:302024-10-14T17:50:15+5:30
अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेत सीआरपीएफचे जवान तैनात असतात.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा दिली आहे. या झेड श्रेणीच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात येणार आहे. राज्यपाल होण्यापूर्वी थावरचंद गेहलोत मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. दरम्यान, केंद्र सरकारने कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
चिराग पासवान यांच्या सुरक्षेत वाढ
केंद्र सरकारने कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. चिराग पासवान (४१) हे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री तसेच लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष आहेत. चिराग पासवान यांनी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान असे संबोधले होते.
चिराग पासवान यांना झेड श्रेणीची सुरक्षा
आतापर्यंत चिराग पासवान यांच्या सुरक्षेखाली केंद्रीय निमलष्करी दल सशस्त्र सीमा बल (SSB) ची एक छोटी तुकडी तैनात करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) व्हीआयपींची सुरक्षा करणाऱ्या युनिटला चिराग पासवान यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचे निर्देश दिले आहेत.
सीआरपीएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात असणार
अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेत सीआरपीएफचे जवान तैनात असतात. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्याशिवाय इतर केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांचा समावेश आहे.
झेड श्रेणीत २२ ते २४ जवानांचा ताफ्यात समावेश असेल
दरम्यान, व्हीआयपी सुरक्षा कवच श्रेणींमध्ये झेड प्लस ही सर्वोच्च मानली जातो. यानंतर 'झेड', 'वाय प्लस' आणि 'एक्स' श्रेणीची सुरक्षा येते. २२ ते २४ सुरक्षा कर्मचारी झेड श्रेणीच्या सुरक्षेत तैनात आहेत, ज्यात शार्पशूटर आणि प्रशिक्षित कमांडो यांचा समावेश आहे.