"आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन केले?"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:40 AM2022-03-28T09:40:22+5:302022-03-28T09:40:58+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा रोखठोक सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून भाजप व आम आदमी पार्टीदरम्यान चांगलीच जुंपली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप काश्मिरी पंडितांच्या पलायनावरून राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे जम्मू-काश्मीरमध्ये पुनर्वसन केले, असा रोखठोक सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला.
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट यूट्यूबवर टाकावा आणि या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई काश्मीर पंडितांच्या कल्याणासाठी खर्च करावी, अशी सूचनाही केजरीवाल यांनी पुन्हा केली आहे. चित्रपटावरील त्यांची टिप्पणी आणि भाजपाच्या टीकेसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत कश्मिरी पंडितांनी केलेल्या पलायनानंतर केंद्रात गेल्या आठ वर्षांसह १३ वर्षे भाजपाचे सरकार होते. या अवधीत किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यात आले? काश्मिरी पंडितांचे एक तरी कुटुंब काश्मीरला परतले का? काश्मीर पंडितांच्या घर वापसीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.
अनुपम खेर यांचा पलटवार
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंबंधी अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टिप्पणीवर अभिनेता अनुपम खेर भडकले आहेत. काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेवर केजरीवाल विधानसभेत बोलताना विनोदी कलाकाराचे काम करण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका अनुपम खेर यांनी केली आहे.खेर पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना भाजप किंवा पंतप्रधानांना बोलायचे असल्यास त्यांनी थेट त्यांच्याशी बोलले पाहिजे होते. नाहक आमच्या चित्रपटाला मध्ये आणत हा प्रचाराच्या धाटणीचा चित्रपट असल्याचे म्हणणे लाजीरवाणे आहे. केजरीवाल यांनी चित्रपट पाहिलेला नाही. विधानसभेत ते विनोदी कलाकाराचे काम करण्याचा प्रयत्न करत होते. केजरीवालांना घरे-दारे सोडून परागंदा झालेल्या लाखो काश्मिरी हिंदूंबद्दल काही वाटत नाही. प्रत्येक भारतीयाने सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघावा आणि केजरीवाल यांच्या असंवदेनशीलपणाला सडेतोड उत्तर द्यावे, हीच माझी केजरीवाल यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया होय.