किती मंत्र्यांची मुलं सैन्य दलात भरती होतात?, नक्षलवादी हल्ल्यानंतर संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 11:02 AM2021-04-06T11:02:57+5:302021-04-06T11:04:03+5:30
गृहमंत्री अमित शहा हल्ल्याच्या ठिकाणी पाहून केली. त्यावेळी बोलताना, जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आणखी ताकदीने लढू आणि या लढाईत आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
जगदलपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत शनिवारी झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणाची अमित शाह यांनी पाहणी केली. तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कम्युनिष्ट पक्षाचा नेते कन्हैय्या कुमार यांनीही तीव्र संताप व्यक्त करत प्रश्न विचारला आहे.
गृहमंत्री अमित शहा हल्ल्याच्या ठिकाणी पाहून केली. त्यावेळी बोलताना, जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आणखी ताकदीने लढू आणि या लढाईत आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. (amit shah visit jagdalpur and react on Bijapur Naxalite Attack) जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही. ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू. छत्तीसगडच्या जनतेला आणि देशवासीयांना आश्वस्त करतो की, नक्षलवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यात येईल. पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने या नक्षलवादी हल्ल्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे अमित शाह म्हणाले. मात्र, ज्यांच्या घरातील मुलगा शहीद झालाय, त्या कुटुंबीयांचे अश्रू पाहिल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कन्हैय्याकुमार यांनी ट्विट करुन थेट गृहमंत्र्यांना लक्ष्य केलंय.
बाप गृहमंत्री-बेटा बीसीसीआई सेक्रेटरी
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) April 5, 2021
बाप किसान-बेटा जवान
बेशर्म सत्ता से पूछिए कि कितने मंत्रियों के बच्चे फ़ौज में शामिल होते हैं?
कायराना नक्सली हमले में लहू देश के आम लोगों का बहता है और कुर्सीजीवी इसका फ़ायदा उठाते हैं
देश को ये साज़िश समझना होगा
वीर जवानों व किसानों को नमन!
कन्हैय्याकुमारने आपल्या ट्विटमध्ये अमित शहांना लक्ष्य करत, केवळ शेतकऱ्याचाच पोरगा सैन्यात दाखल होतो, असे म्हटले. तर, ज्याचे वडिल गृहमंत्री आहेत, त्यांचा मुलगा बीसीसीआयचा सचिव होतो, असा टोलाही अमित शहा यांना लगावला आहे. निर्लज्ज सत्ताधाऱ्यांना विचारायला हवं, किती मंत्र्यांची मुले सैन्य दलात भरती होतात? भ्याड नक्षली हल्ल्यात देशातील सर्वसामान्य लोकांचा रक्त सांडतं अन् खुर्चीवर असलेले याचा फायदा घेत असतात. देशातील जनतेला हे कटकारस्थान समजायला हवं. देशातील वीर जवानांना आणि शेतकऱ्यांना नमन ! असे ट्विटर कन्हैय्या कुमारने केलं आहे.
जवानांचं बलिदान देश कायमच लक्षात ठेवेल
नक्षलवाद्यांविरोधात लढाई करताना या जवानांनी दिलेले बलिदान देश कायमच लक्षात ठेवेल. जवानांनी नक्षलवादाविरोधात दिलेला हा निर्णायक लढा कायमच स्मरणात राहील, असे सांगत गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहोचली असून, नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र झाली आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले.
नक्षलवादाविरोधात लढा देण्याचं धैर्य कायम
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली असून, हा लढा सुरू ठेवला पाहिजे, असे अधिकाऱ्यांनी जोर देऊन म्हटले आहे. यावरून आपल्या जवानांचे मनोधैर्य किती उंचावलेले आहे, ही बाब दिसून येते, असे शाह यांनी नमूद केले.
दरम्यान, छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील बस्तरच्या जंगलात सुरक्षा दलांनी एकत्रित येत नक्षलवाद्यांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. तारेम येथून निघालेल्या एका पथकाची शनिवारी दुपारी जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांच्या एका गटाशी धुमश्चक्री उडाली. सुमारे तीन तासांपर्यंत ही धुमश्चक्री चालली होती. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी रात्री हाती लागले होते. १७ जवान मात्र बेपत्ता होते. रविवारी सुरक्षा दलांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली असता सर्व जवानांचे मृतदेह सापडले. या चकमकीत ३० जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.