राजधानी दिल्लीत राहतात किती माकडे? लवकरच होणार मोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 04:22 PM2019-07-11T16:22:43+5:302019-07-11T16:25:59+5:30
सध्या दिल्लीकर माकडांच्या उच्छादामुळे त्रस्त झालेले आहेत.
नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. दरम्यान, सध्या दिल्लीकर माकडांच्या उच्छादामुळे त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे दिल्लीतील माकडांची समस्या किती भयानक आहे हे जाणून घेण्यासाठी दिल्लीत असलेल्या माकडांची लवकरच मोजणी करण्यात येणार आहे. ही मोजणी देहराडूनस्थित वाइल्डलाइफ इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या मदतीने होणार आहे. दिल्लीतील माकडांना पकडण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र ही समस्या जैसे थे आहे.
दिल्लीतील माकडांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून दिल्ली महावनगरपालिका आणि वनविभागामध्ये वाद सुरू होता. अखेरीस 2007 मध्ये दिल्ली सरकारने माकडांना पकडण्यासाठी पिंजरे उपलब्ध करून द्यावेत. तसेच महानगरपालिकेने हे पिंजरे विविध ठिकाणी ठेवावेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांची बैठक झाली. या बैठकीत माकडांची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दिल्लीत नेमकी किती माकडे राहतात याचा आकडा समजू शकलेला नाही.
यापूर्वी दिल्ली महानगरपालिकेने नागरी वस्त्यांमधील माकडांना पकडून असोला वन्यजीव उद्यानात सोडले आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही झाला आहे. मात्र असे असतानाही राजधानीमध्ये गतवर्षी सुमारे 950 जणांना माकडांनी चावा घेतल्याचे समोर आले होते. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
निवासी भागांमधील माकडांची घुसखोरी रोखण्यासाठी माकडांना सोडण्यात आलेल्या भागांच्या बाहेर 15 फूट उंच भिंत उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होता. दरम्यान, सुमारे 20 हजारहून अधिक माकडांना अभयारण्यात सोडण्यात आले. मात्र रहिवासी भागात अद्याप किती माकडे आहेत, याचा नेमका आकडा आपल्याकडे नाही. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.