UP Election Result: 80:20 वर घमासान अन् भगवी लाट; पण उत्तर प्रदेशात किती मुस्लीम उमेदवार निवडून आले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:07 PM2022-03-11T18:07:13+5:302022-03-11T18:07:47+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी या निवडणुकीचे वर्णन 80:20 असे केले होते. यानंतर, भाजपला हटविण्यासाठी मुस्लीम मतदार सपाकडे आकर्षित होताना दिसून आले. अशा परिस्थितीत, या निवडणुकीत किती मुस्लीम उमेदवार विजयी झाले? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल.
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) भगव्या लाटेने विरोधकांचे सर्वच प्रयत्न उधळून लावले. या निवडणुकीत भाजपने 273 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा विक्रम केला आहे. तर, समाजवादी पार्टी (एसपी) आघाडीला 125 जागांवरच समाधान मानावे लागले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी या निवडणुकीचे वर्णन 80:20 असे केले होते. यानंतर, भाजपला हटविण्यासाठी मुस्लीम मतदार सपाकडे आकर्षित होताना दिसून आले. अशा परिस्थितीत, या निवडणुकीत किती मुस्लीम उमेदवार विजयी झाले? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल.
या 18 व्या विधानसभा निवडणुकीत एकूण 36 अल्पसंख्याक उमेदवार निवडणूक जिंकून विधानसभेचे सदस्य होणार आहेत. हे सर्वच्या सर्व आमदार सपा आघाडीचे आहेत. तर एनडीएचा एकमेव मुस्लीम उमेदवार स्वार मतदारसंघातून आजम खानचा मुलगा अब्दुल्ला आजमविरुद्ध पराभूत झाला. तर बसपा, काँग्रेस आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे विजयी झालेले एकूण 5 उमेदवार हिंदू आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण 403 जागा आहेत. यानुसार, एकूण 20 टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या या राज्यात 8.92 टक्के मुस्लीम आमदार असतील.
सपाने यादव-मुस्लीम पार्टी, या टॅगपासून आपला पिछा सोडविण्यासाठी पहिल्यांदाच केवळ 64 मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले होते. तर बसपाने 88 मुस्लीम उमेदवारांना आणि काँग्रेसने 75 मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले होते. यातच, एआयएमआयएमनेही जवळपास 60 हून अधिक मुस्लीम उमेदवारांना उत्तर प्रदेशच्या निवडणूक आखाड्यात उतरवले होते, परंतू त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.