"तुमच्या लेकानं किती रन्स काढले?"; क्रीडामंत्र्यांचा अमित शहांना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 08:48 PM2023-07-31T20:48:05+5:302023-07-31T21:08:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा काँग्रेसमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका करताना दिसून येतात.
चेन्नई - भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मिशन २०२४ ला सुरुवात केली असून अनेक राज्यात बड्या नेत्यांचे दौरे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशा राज्यात भेटी व दौरे करताना जनतेला संबोधित करत आहेत. तर, भाजपच्या बड्या नेत्यांची, मंत्र्यांची फौजही विविध ठिकाणी सभांमधून जनतेसोबत संवाद साधत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूतून भाजपाच्या एन मन, एन मक्कल म्हणजेच माझी जमिन-माझे लोक यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर, बोलताना येथील घराणेशाहीवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा काँग्रेसमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे तामिळनाडूतील कार्यक्रमादरम्यान, अमित शहा यांनी घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करा, त्यासाठीच भाजपने माझी जमिन-माझे लोक ही यात्रा काढल्याचे म्हटले. अमित शहांच्या या भाषणानंतर तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांना टोला लगावला. उदयनिधी यांनी अमित शहांच्या मुलाच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित केला. जय शहा हे सध्या बीसीसीआयचे सचिव आहेत. त्यावरुन, स्टॅलिन यांनी अमित शहांना थेट सवाल केला.
तुमच्या मुलाने किती धावा काढल्या आहेत, ज्यामुळे त्याला बीसीसीआयचे सचिव करण्यात आलंय?, असा प्रश्न क्रीडामंत्र्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना विचारला. ''निवडणूक लढत मी आमदार झालो. नंतर मला मंत्रीपदाची संधी मिळाली. पण, मला अमित शाह यांना विचारायचे आहे की, तुमचा मुलगा बीसीसीआयचा सचिव कसा झाला? त्याने किती क्रिकेटचे सामने खेळले? आणि किती धावा काढल्या आहेत?'', असा पलटवार स्टॅलिन यांनी केला. दरम्यान, तामिळनाडूत भाजपने द्रमुक पक्षाविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. तर, द्रमुकनेही भाजपला जशास तसे प्रत्त्युतर देण्यास सुरुवात केलीय.