दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 14:33 IST2024-05-26T14:31:54+5:302024-05-26T14:33:38+5:30
Lok Sabha Elections 2024 : ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल येतील आणि त्यानंतर संपूर्ण विरोधक विभागले जातील, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.

दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत
नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत भाजपा दिल्लीतील सर्व ७ जागा जिंकणार असल्याचा दावा आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. एवढेच नाही तर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या भाजपावरील विधानवरही प्रतिक्रिया दिली आहे.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल येतील आणि त्यानंतर संपूर्ण विरोधक विभागले जातील, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. तसेच, आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, तेजस्वी यादव बरोबर आहेत, त्यांनी फक्त एक ओळ चुकीची सांगितली. तेजस्वी यादव यांनी 'टन-टन-टन टन-टन-तारा', पूरा विपक्ष बंटाधार है, असे म्हणायला हवे होते. पुढे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, बिहारमध्ये सातही टप्प्यात निवडणुका लढल्या जात आहेत. ४० लोकसभा मतदारसंघांसह, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच, बिहार हे भारतीय राजकारणाला आकार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे.
शुक्रवारी (२४ मे) तेजस्वी यादव यांनी भाजपावर टीका करत म्हटले होते की, भाजपा ४ जूननंतर गायब होणार आहे. तसेच, एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट करताना, तेजस्वी यादव म्हणाले होते की, "टन टना टन टन टारा, बीजेपी होगी नौ दो ग्यारह". दरम्यान, तेजस्वी यादव देखील सतत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. भाजपावर सतत निशाणा साधत आहेत. कधी कविता म्हणत तर कधी फिल्मी शैलीत ते भाजपावर निशाणा साधत आहेत.