बेरोजगारीमुळे गेल्या 3 वर्षात किती लोकांच्या आत्महत्या? मोदी सरकारने संसदेत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:06 PM2022-02-09T19:06:22+5:302022-02-09T19:06:57+5:30
Parliament : देशात मागील तीन वर्षाच्या काळात अनेकांनी बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.
नवी दिल्ली : देशात बेरोजगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. देशात मागील तीन वर्षाच्या काळात अनेकांनी बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. 2018 ते 2020 दरम्यान दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 16,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या, तर 9,140 लोकांनी बेरोजगारीमुळे आपला जीव गमवला आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, 2020 मध्ये 3,548 लोकांनी तर 2019 मध्ये 2,851 आणि 2018 मध्ये 2,741 लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या. याचबरोबर, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे.
नित्यानंद राय म्हणाले की, 2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या, तर 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केल्या. तसेच, सरकार मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे नित्यानंद राय यांनी संसदेत सांगितले.
विरोधकांकडून बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित
संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विविध विरोधी खासदारांनी बेरोजगारीचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. यावेळी विरोधकांनी आरोप केला आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर असलेल्या समस्येला तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात फारच कमी तरतूद करण्यात आली आहे.