जाणून घ्या ग्रामीण भारताची कमाई किती आणि खर्च किती...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 10:12 AM2018-08-18T10:12:12+5:302018-08-18T10:24:58+5:30
शेती क्षेत्राशी संबंधीत 52.5 टक्के लोकांवर कर्जाचे ओझे
नवी दिल्ली : कृषीप्रधान देश असलेल्या भारतातील नागरिकांची कमाई शेतीपेक्षा मजुरीतून होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसेच ग्रामीण भागातील 90 टक्के घरांमध्ये मोबाईल वापरले जात असून त्यांच्या बचतीचा सर्वाधिक हिस्सा बँकांमध्ये जमा आहे. मात्र, शेती क्षेत्राशी संबंधीत 52.5 टक्के लोकांवर कर्जाचे ओझे असल्याचा धक्कादायक अहवाल नाबार्डने दिला आहे.
ग्रामीण भागातील एका परिवाराचे वार्षिक सरासरी उत्पन्न 1,07,172 रुपये आहे. तर शेतीशी संबंधित नसलेल्या परिवाराचे उत्पन्न 87,228 रुपये आहे. या उत्पन्नाचा 19 टक्के हिस्सा शेतीतून येतो. तर दिवसावर मजुरी करणाऱ्यांचा हिस्सा 40 टक्के आहे.
राज्यांची स्थिती
ग्रामीण परिवारांमध्ये सरासरी उत्पन्नाच्या बाबतीत पंजाब (16,020) सर्वात पुढे आहे. दुसऱ्या नंबरवर केरळ (15130) आणि तिसऱ्या नंबरवर हरियाणा (12072) हे राज्य आहे.
टीव्ही, मोबाईल किती जणांकडे?
अहवालानुसार 87 टक्के कुटुंबांकडे मोबाईल आहे. तर 52 टक्के कुटुंबांकडे टीव्ही आहे. 34 टक्के कुटुंबांकडे दुचाकी तर केवळ 3 टक्के कुटुंबांकडे चारचाकी आहे. 2 टक्के लोकांकडे लॅपटॉप आहे.
जनधन योजनेचे यश
केंद्र सरकारने राबविलेल्या जनधन योजनेचा सकारात्मक परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहे. या भागातील 88.1 टक्के लोकांची बँकांमध्ये बचत खाती आहेत. तर 55 टक्के शेतकरी कुटुंबांकडे एक बँक खाते आहे. प्रत्येक कुटुंबाची सरासरी बचत 17,488 आहे. 25 टक्के कुटुंबे विम्याच्या छत्राखाली येतात.
47 टक्के कुटुंबे कर्जाच्या ओझ्याखाली
शेतीशी संबंधीत 52 ट्क्के कुटुंबे तर 42.8 टक्के बिगर शेती कुटुंबे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहेत. राष्ट्रीय स्तरावर 47 टक्के लोकांवर कर्ज आहे.
कुठे झाले सर्व्हेक्षण?
देशातील 29 राज्यांतील 245 जिल्ह्यांमध्ये नाबार्डने सर्व्हे केला आहे. यामध्ये 40,327 ग्रामीण कुटुंबाना सहभागी करण्यात आले. या प्रक्रियेत एकूण 1,87,518 लोकांना सहभागी करण्यात आले.