Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत किती खर्च झाला? किती रक्कम शिल्लक, आली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 03:15 PM2023-10-08T15:15:44+5:302023-10-08T15:16:11+5:30
Ram Mandir: अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. हे मंदिर जानेवारी महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम वेगानं सुरू आहे. हे मंदिर जानेवारी महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. दरम्यान, राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत ९०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. तर श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बँक खात्यामध्ये ३ हजार कोटींची रक्कम शिल्लक आहे. ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी ७ ऑक्टोबर रोजी याबाबतची माहिती दिली आहे. ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले की, मंदिराच्या बांधकामावर ५ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२३ या काळात ९०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर ३ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत.
चंपत राय यांनी सांगितले की, बैठकीमध्ये परकीय चलन देणगी म्हणून स्वीकारण्याच्या कायदेशीर प्रक्रियेबरोबरच १८ बिंदूंवर चर्चा झाली. तसेच ट्रस्टने एफशीआरएच्या नियमानुसार परवागनीसाठी अर्ज केला आहे. शरयू नदीच्या किनाऱ्यावरील राम कथा संग्रहालयाला एका ट्रस्टचं रूप दिलं जाईल. यामध्ये राम मंदिराचा ५०० वर्षांचा इतिहास आणि ५० वर्षांमधील कायदेशीर कागदपत्रे ठेवली जातील.
अयोध्येमध्ये पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जानेनारी रोजी प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यंक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील सुमारे १० हजार मान्यवर सहभागी होण्याची शक्यता आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, प्राण प्रतिष्ठापना सोहळा भव्यदिव्य बनवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. राम जन्मभूमीवर येणाऱ्या भाविकांना प्रसादासोबत श्री रामाच्या तसबिरी वितरीत केल्या जातील. तसेच १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत पाच लाख गावामध्ये पूजा करण्यात आलेला अक्षत तांदूळ वाटला जाईल. तसेच विविध भागातील मंदिरांमध्ये अयोध्येसारखाच उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार समारंभासाठी एका धार्मिक समितीची स्थापना करण्यात आली आहे. ती सर्व कामकाज पाहत आहे. मुख्य समारंभापूर्वी भगवान श्री रामासमोर तांदुळांची पूजा केली जाईल. त्यानंतर हे तांदूळ देशभरात वाटले जातील. प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या दिवशी सूर्यास्तावेळी सर्वांनी घरात पाच दिवे लावावेत, असं आवाहनही ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे.