१ एप्रिलपासून पीएफ काढताना किती लागेल टॅक्स?; जाणून घेऊ याविषयी...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 06:47 AM2022-03-13T06:47:05+5:302022-03-13T06:47:16+5:30
आता १ एप्रिलपासून पीएफमधील रक्कम काढण्यावर टीडीएस आकारला जाणार आहे.
कोरोनाकाळात अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे जमापूँजीवर उदरनिर्वाह चालवण्याची वेळ आली. साहजिकच नोकरदारांचे हुकमाचे पान असलेल्या भविष्य निर्वाह निधीवरही (पीएफ) त्याचा ताण आला. अनेकांनी पीएफमधील रक्कम काढण्याला प्राधान्य दिले. अजूनही हा सिलसिला सुरू आहे. परंतु आता १ एप्रिलपासून पीएफमधील रक्कम काढण्यावर टीडीएस आकारला जाणार आहे. जाणून घेऊ याविषयी...
नवीन नियम काय?
पीएफवरील निधीसंदर्भात नवीन नियम १ एप्रिलपासून अंमलात येणार आहे. नवीन नियमानुसार पीएफमधील निधी अडीच लाखांहून अधिक असेल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारणार आहे. सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांना पीएफवर ८.५% व्याज मिळते. मात्र, आता हा व्याजदर कमी करून ८.१% टक्के करण्यात आले आहे.
पैसे काढण्यापूर्वी हे लक्षात ठेवा...
पीएफमधून पैसे काढण्यावर आता अनेक निर्बंध आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यावर कर आकारणी केली जाणार आहे. तसेच नोकरीतील सेवाकाळाला पाच वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच कर्मचाऱ्याने पीएफमधील रक्कम काढल्यास त्यावर १०% टीडीएस आकारला जाणार आहे. खात्यातून काढून घेण्यात येणारी पीएफची रक्कम ५०,००० रुपयांहून अधिक असेल तरच टीडीएस लागू होणार आहे. टीडीएस कापला जाऊ नये यासाठी कर्मचारी १५जी वा १५ एच यापैकी एक अर्ज भरून देऊ शकतो.
नोकरीचा सेवाकाळ ५ वर्षांहून अधिक असेल तर...
एखाद्या कर्मचाऱ्याने ‘कायमस्वरूपी कर्मचारी’ म्हणून नोकरीतील सेवाकाळाचे पाच वर्षे पूर्ण केली असतील तर त्याने पीएफ खात्यातून काढलेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. या ठिकाणी ‘कायमस्वरूपी कर्मचारी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण कर्मचारी वर्षभरासाठी प्रोबेशन वा कंत्राटी पद्धतीवर रुजू झाला आणि नंतर चार वर्षे तो कायम कर्मचारी म्हणून संस्थेत राहिल्यास नियोक्ता त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर टीडीएस आकारू शकेल. तथापि, काही विशिष्ट परिस्थितींत पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच, म्हणजे कर्मचारी आजारी पडल्यास वा कंपनीच बंद पडल्यास, कर्मचाऱ्याने पीएफ खात्यातून पैसे काढल्यास त्यावर कर आकारणी केली जाणार नाही.