नितीशकुमार यांना गांधी व गोडसे यांचे विचार कसे चालतात -प्रशांत किशोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 02:56 AM2020-02-19T02:56:24+5:302020-02-19T02:56:30+5:30
नितीशकुमार यांनी मला पक्षातून काढल्याने मी नाराज नाही. त्यांनी मला कायम मुलासारखे वागविले
एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना महात्मा गांधी व त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे या दोघांची विचारसरणी कशी मान्य होते, असा सवाल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी केला. सीएए, एनआरसी या मुद्यांबाबत नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केल्याने प्रशांत किशोर यांची अलीकडेच संयुक्त जनता दलातून हकालपट्टी केली.
नितीशकुमार यांनी मला पक्षातून काढल्याने मी नाराज नाही. त्यांनी मला कायम मुलासारखे वागविले, पण माझे त्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत, असे सांगतच प्रशांत किशोर यांनी नितीश यांच्या राजकारणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महात्मा गांधी व गोडसे यांची विचारसरणी परस्परविरोधी आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना हे दोन्ही विचार कसे काय चालतात? ते भाजपच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन कसे काय करतात? भाजपच्या उमेदवारांसाठी सभा कशा घेतात? बिहारमध्ये नितीशकुमार यांनी खूप सुधारणा केल्या, हे खरे नाही. आजही बिहार देशातील मोठे व मागास राज्यच आहे. बिहारची २00५ मध्ये जी स्थिती होती, त्यात काहीच बदल झालेला नाही. बिहार आताही तितकेच मागास आहे, अशी टीकाही प्रशांत किशोर यांनी केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण राज्याच्या ८ हजारांहून अधिक गावांतील लोकांना संघटित करणार आहोत.
आतापर्यंतचा प्रवास
च्प्रशांत किशोर यांनी पाच वर्षांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार यांच्या पक्षाची निवडणूक रणनीती ठरवली होती. त्याआधी २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कंपनीने भाजप व नरेंद्र मोदी यांची रणनीती ठरविण्याचे काम केले होते.
च्दोन वर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात अधिकृतपणे प्रवेशही केला. मात्र, नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षासाठी रणनीती ठरविण्याचे काम केले. त्यामुळे संयुक्त जनता दलात अस्वस्थता होती.