मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे कितपत सुरक्षित? जाणून घ्या, संपूर्ण माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:01 PM2022-07-27T17:01:08+5:302022-07-27T17:01:47+5:30
voter id and aadhar card link : मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, जी तुम्ही घरी बसूनही सहज पूर्ण करू शकता.
नवी दिल्ली : मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक (Aadhar Card Link with Voter ID) करण्याची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे, तर मध्य प्रदेशसह अनेक ठिकाणी मतदार ओळखपत्र लिंक केले जात आहे. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, जी तुम्ही घरी बसूनही सहज पूर्ण करू शकता.
अलीकडेच, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात आधार कार्डशी मतदार ओळखपत्र लिंक करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. आता अशा परिस्थितीत तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करणे कितपत सुरक्षित आहे?
मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्याचा कायदा करण्यात आला आहे. तेव्हापासून मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभेत विधेयक मांडताना सरकारने हे स्पष्ट केले होते की, मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे लोकांच्या इच्छेवर अवलंबून असेल.
मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे किती सुरक्षित?
विरोधकांचे म्हणणे आहे की, मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केल्याने "गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन" होऊ शकते. बेकायदेशीर पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर डेटा लीक होण्याची आणि वैयक्तिक माहिती सार्वजनिक होण्याची भीती आहे. दुसरीकडे, इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार, आधार कार्डला मतदार ओळखपत्राशी लिंक केल्यास वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका असू शकतो. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केल्याने मतदार यादीचा गैरवापर होऊ शकतो. मात्र, सरकारचे म्हणणे आहे की, मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केल्याने मतदानाची फसवणूक थांबेल. तसेच, आपल्या शहरापासून दूर राहणारे लोकही आधारच्या मदतीने मतदान करू शकतात.