दहशतवादी अबू दुजानाचा 'मोबाइल' ठरला कर्दनकाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 12:35 PM2017-08-01T12:35:02+5:302017-08-01T12:44:11+5:30
भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये मोठं यश मिळालं. काश्मीरमधला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अबू दुजाना याचा खात्मा झाला.
जम्मू-काश्मीर, दि. 1 - भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये मोठं यश मिळालं. काश्मीरमधला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अबू दुजाना याचा खात्मा झाला. भारतीय लष्कराची ब-याच दिवसांपासून अबू दुजानावर नजर होती. अखेर त्याला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं. विशेष म्हणजे दुजानाच्या हत्येसाठी त्याच्या मोबाईल फोननं महत्त्वाची भूमिका बजावली.
गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं होतं. त्यावेळी स्वतःला वाचवण्यात त्याला यश आलं होतं. परंतु पसार होत असताना त्याचा मोबाईल गाडीत राहिला. त्यामुळे सुरक्षा जवानांच्या हाती दहशतवादी हालचालींबाबत मोठा पुरावा लागला. त्या मोबाईलच्या माध्यमातून लष्कराला कॉन्टॅक्ट आणि त्या नंबरचे ट्रॅकिंग करून दहशतवादी चळवळीची माहिती मिळाली. सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. मंगळवारी जेव्हा तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता, त्यावेळी सुरक्षा दलाला त्याची माहिती मिळाली आणि लष्करानं पुलवामामधल्या बाकरीपोरा येथे त्याला चहूबाजूंनी घेरलं. त्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दुजाना ज्या घरात थांबला होता, तिथून जवळपास 4 तास त्यानं एकदाही गोळीबार केला नाही. लष्करानं त्या घरावर रॉकेट लाँचर सोडलं आणि घराला आग लावून दिली. त्याच वेळी अबू दुजानासह लष्कराच्या गोळीबारात आरिफ ललहारीचा खात्मा झाला.
अबू दुजाना लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर होता. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला मारण्यासाठी ऑपरेशन राबवलं होतं. त्याच्यावर लष्करानं 10 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. सीआरपीएफ 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीच्या टीमनं मिळून ही कारवाई केली होती. तत्पूर्वी 19 जुलैला सुद्धा लष्करानं अबू दुजानाला घेरलं होतं. पुलवामातल्या बंदेरपुरा गावात लष्कर आणि एसओजीच्या जवानांनी अबू दुजानाला पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र दुजाना त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांना चकमा देऊन फरार होण्यात यशस्वी ठरला होता. काश्मीर खो-यात लष्करानं ऑपरेशन ऑलआऊट राबवलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत लष्करानं दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लष्करानं वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशनही राबवलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत लष्करानं आतापर्यंत 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.